
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
मोटरसायकलवरून व्यायामशाळेत जाणाऱ्या दोन चुलत भावांवर बिबट्याने झडप मारून हल्ला केला. जिवाची बाजी लावून बिबट्याचा हल्ला परतवला असला बिबट्याशी थरारक झुंज देत दोघेजण बचावले. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सोमवारी सकाळी पावणेसात वाजता घडली.
योगेश जाधव (21) आणि विक्रांत जाधव (17 रा.मावळंगे) हे दोघे चुलत भाऊ सकाळी पावणेसात वाजता गणेशगुळे येथील व्यायामशाळेत दुचाकीवरून निघाले होते. दुचाकी योगेश जाधव चालवत होता तर पाठीमागचे विक्रांत जाधव बसला होता. मावळंगे येथील रस्त्याला चढ असलेल्या ठिकाणी मोटरसायकल येताच मोटरसायकलचा वेग कमी झाला. त्याचवेळी झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटरसायकलवर मागे बसलेल्या विक्रांतवर झडप घातली. त्याचक्षणी मोटरसायकलसह दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर बिबट्याने योगेश जाधवच्या पायावर पंजा मारला. योगेशने पाय झाडण्याचा प्रयत्न करताच बिबट्याने विक्रांतच्या पाठीवर जोरदार पंजा मारून जखमी केले. दोघांचा आरडाओरडा सुरू होता मात्र बिबट्या जागेवरून हालत नव्हता. बिबट्याने पुन्हा विक्रांतच्या कंबरेवर पंजा मारला तेव्हा मात्र दोघांनी मोटरसायकल उचलून बिबट्याच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बिबट्या थोडा मागे सरकला तीच संधी साधून दोघेही मोटरसायकलवर बसले मात्र मोटरसायकल सुरू होत नव्हती. मोटरसायलक न्युट्रलवर असल्याचे लक्षात येताच गिअर बदलून दोघांनी पळ काढला. काही मिनिटे बिबट्याशी थरारक झुंज देत ते दोघे बचावले.
मेर्वी, गणेशगुळे, मावळंगे परिसरात बिबट्याचा दीड-दोन वर्षं वावर सुरू आहे. आतापर्यंत चौघांवर बिबट्याने हल्ला केला आहे. यापूर्वी बस थांब्यावर उभ्या असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर आता सलग तीनवेळा मोटरसायकलस्वारांवर झडप घालून बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याची त्यापरिसरात मस्ती सुरू असून वनविभागाला सुस्ती आली आहे. वारंवार घटना घडूनही बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग हालचाली करताना दिसत नाही. गेले दोन दिवस थूळवाडीत बिबट्या फिरताना दिसला होता. तसेच काही दिवसांपूर्वी बिबट्याचे पिल्लू एका घरात सापडले होते.























































