
सामना प्रतिनिधी । हिमायतनगर
सोमवारी नगरपंचायतीच्या प्रांगणात नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील शेकडो तरुणांनी व काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आमदार नागेश पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे हिमायतनगर शहरातील काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे.
काँग्रेस पक्षाच्या हुकुमशाही वृतीला कंटाळून हिमायतनगर शहरातील काँग्रेस पक्षाचे माजी अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मन्नान भाई, काँग्रेस पक्षाचे युवा नेते विपुल दंडेवाड, भाजपाचे राजेश जाधव, विठ्ठल पार्डीकर, भाजपा पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख नितीन मुधोळकर, मिराज भाई मसालेवाले, बाबू भाई नेहरूनगर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या कामावर विश्वास ठेऊन पक्षाला शेवटचा रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी हिमायतनगर नगर पंचायतचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, हदगाव येथील माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, युवासेनेचे विशाल राठोड, प्रकाश रामदीनवार, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन तुप्तेवार यांच्यासह असंख्य नवनिर्वाचित कार्यकर्ते व पत्रकार व्यापारी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























































