
सामना ऑनलाईन,मुंबई
मेट्रो, मोनोनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता रोप वे प्रकल्पही उभारण्याच्या विचारात आहे. मालाड ते मार्वे आणि गोराई ते बोरिवली या साडेचार किलोमीटर अंतरासाठी असे रोप वे उभारण्याचा ‘एमएमआरडीए’चा मानस आहे. हा रोप वे कितपत शक्य आहे हे पाहण्यासाठी मेसर्स इंडियन पोर्ट रेल ऍण्ड रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. ही कंपनी या प्रकल्पाचा अहवाल बनवणार आहे.
एमएमआरडीएचे अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक झाली त्यात हा प्रस्तावित रोप वेबाबतचा निर्णय घेण्यात आला. न्यूयॉर्क, कोलंबिया, टर्की या देशांमध्ये असे रोप वे प्रकल्प यशस्वी आणि लोकप्रिय झाले आहेत. मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर मालाड-मार्वे आणि गोराई-बोरिवली रोप वे उभारण्याचा विचार असून तो यशस्वी झाल्यास अन्य ठिकाणीही असे प्रकल्प उभारण्याचा विचार केला जाईल असे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.
बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी साडेतीन हजार कोटी रुपये यावेळी मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे पादचारी मार्गांचे रुंदीकरण, सायकलमार्ग, वाहनतळ परिसर, रहदारी सिग्नल सुधारणा, पथदिवे, सीसीटीव्ही, स्थळदर्शक नकाशे, मेट्रो स्थानकापासून ये-जा करणाऱ्या बससेवा आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. सूर्या धरण प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या कवडास बंधाऱ्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला अर्थसहाय्य देणे, वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जी’ ब्लॉकमधील सी-65 हा भूखंड जपानच्या गोईसू रिऍलिटी कंपनीला 2238 कोटी रुपये भाडेपट्टीवर 80 वर्षांसाठी देणे हे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.

























































