
सामना प्रतिनिधी, मुंबई
झारखंड राज्यात झालेल्या सामूहिक अत्याचारामध्ये एका तरुणाचा बळी गेला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून टिक टॉक ऍपद्वारे व्हिडीओ बनवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने तशा टिक टॉक विरोधात मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झारखंड येथे मॉब लिचिंगमध्ये तबरेज अन्सारी या तरुणाचा बळी गेला होता. या घटनेच्या संदर्भात टिकटॉकवर व्हिडीओ बनवून ते इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे. तसे व्हिडीओ सामाजिक सलोखा बिघडवणारे असल्याने त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तशा व्हिडीओं विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.






























































