मुंबईकरांसाठी 400 एसी बसेस,ऑगस्टपासून अवघ्या सहा रुपयांत गारेगार प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बेस्टचे किमान तिकीट पाच रुपये केल्यानंतर आता लवकरच मुंबईकरांना अवघ्या सहा रुपयांत गारेगार एसी बसमधून प्रवास करायला मिळणार आहे. आपल्या ताफ्यात एसी बसेसची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी 400 मिनी एसी बसेसच्या खरेदी प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्या शंभर ते दोनशे एसी बसेस दाखल होणार असल्याने मुंबईरांचा प्रवास थंडा थंडा कूल होणार आहे.

बेस्टने वेट लीजवर भाडेतत्त्वावरील 450 बसेस खरेदी करण्याचा मूळ करार फेब्रुवारी 2018 मध्ये केला होता. मात्र याविरोधात युनियन कोर्टात गेल्यानंतर टेंडर रखडल्याने त्यामध्ये बदल करण्यात आला असल्याने हा प्रस्ताव पुन्हा मंगळवारी बेस्ट कमिटीत चर्चेला आला होता. या करारात ड्रायव्हरचे वय 21 ते 58 दरम्यान असावे असे नमूद करण्यात आल्याने कमाल वय कमी करावे अशी मागणी बेस्ट सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली. तसेच या बसेस रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी धावणार नसल्याचे कंपनीने अटींमध्ये नमूद केल्याने मग बेस्ट कोणासाठी चालविणार, असा सवालही गणाचार्य यांनी केला. तर करार बेस्टचे आणि मुंबईकरांचे हित पाहणारा असावा, कंत्राटदाराचे हित पाहणारा नसावा असे सदस्य रवी राजा यांनी सांगितले. तर नव्या बसेससाठी चालक नेमताना ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना संधी द्यावी किंवा पैशाचा अपहार वगळता अन्य कारणाने नोकरीवरून काढलेल्या बेस्ट चालकांना चालक म्हणून नेमावे अशी मागणी शिवसेना सदस्य सुहास सामंत यांनी केली.

या बसेससाठी वाहक लागणार असल्याने बेस्टने त्याची तरतूद आधीच करावी. बेस्टच्या वर्धापन दिनी किंवा स्वातंत्र्यदिनी या एसी बसेसचे उद्घाटन व्हावे, अशी मागणी शिवसेना सदस्य अनिल कोकीळ यांनी केली. तर स्थायी समिती सदस्य यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव बेस्टच्या भल्याचा असून त्यात राजकारण आणू नये, तो संमत करावा अशी मागणी केली.

पहिल्यांदा 100 ते 200 बसेस दाखल होतील

आधीच्या कराराप्रमाणे मिडी बसेस पुरविण्यास वाहन उत्पादकाने असमर्थता व्यक्त केल्याने आता त्याऐवजी संपूर्ण मिनी एसी बसेस खरेदी करण्यात येणार असून ऑगस्टपर्यंत पहिल्या 100 ते 200 एसी बसेस येणार असून नोव्हेंबरपर्यंत एकूण 400 एसी बसेसचा समावेश होईल, असे बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले.