तीन दिवसांत आठ लाख 69 हजारांची बेकायदा पार्किंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेने 7 जुलैपासून बेकायदा पार्किंगविरोधात सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत आठ लाख 69 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आज तिसऱया दिवशी 53 चारचाकी, 51 दुचाकी आणि तीन तीनचाकी अशा 107 बेकायदा पार्किंग करणाऱयांविरोधात दंडाची कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून पाच लाख 19 हजार 460 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या आदेशानुसार 7 जुलैपासून संपूर्ण मुंबईत बेकायदा पार्किंगविरोधात ही कारवाई सुरू आहे. या कारवाईला काही ठिकाणी नागरिकांचा, वाहनचालकांचा विरोधही होत आहे. आज लोअर परळ या ठिकाणी कारवाईविरोधात स्थानिकांनी आंदोलनही केले. पालिकेने मात्र कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, संबंधित वाहन मालकांद्वारे 30 दिवसांच्या आत दंड भरून वाहन सोडवून न नेल्यास त्याचा महापालिकेद्वारे लिलाव करण्यात येणार आहे.

अशी झाली कारवाई
243 वाहनांवर कारवाई करून रुपये 8 लाख 69 हजार 800 एवढी दंडवसुली करण्यात आली. या 243 वाहनांमध्ये 133 चारचाकी, 9 तीनचाकी व 101 दोनचाकी वाहनांचा समावेश आहे. या कारवाईपोटी आजपर्यंत एकूण 8 लाख 69 हजार 800 रुपये एवढी रक्कम दंडवसुलीतून जमा झाली आहे.