
सामना प्रतिनिधी । लंडन
दर चार वर्षांनंतर आयोजित करण्यात येणाऱया वर्ल्ड कप या क्रिकेट विश्वातील मानाच्या स्पर्धेचा उद्या शेवट होईल. या स्पर्धेत एकूण 70 कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला आहे. रविवारी होणाऱया लढतीत जो संघ चॅम्पियन होईल त्याच्यावर 28 कोटी रुपयांचा वर्षाव करण्यात येईल. उपविजेता संघ 14 कोटी रुपयांचा मानकरी ठरेल. एवढेच नव्हे तर हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया या गतविजेत्यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला असला तरी त्यांना प्रत्येकी 5.6 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यामध्ये विजयी होणारा संघ मालामाल होईल एवढे मात्र पक्के आहे.
साखळीत जिंकणाऱयांना 28 लाख
वर्ल्ड कपमधील साखळी फेरीत विजयी होणाऱया संघाला 28 लाख रुपये देण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर बाद फेरीत पोहचणाऱया संघांना प्रत्येकी 70 लाख रुपये बक्षिसाच्या रूपात प्रदान करण्यात येणार आहेत.
आयसीसीकडे राहणार मूळ ट्रॉफी
क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफी 11 किलोग्रॅम वजनाची असते. सोने व चांदी यांच्या मिश्रणाने ही तयारी केली जाते. 60 सेंटीमीटर उंचीची ट्रॉफी बनवायला तब्बल दोन महिने लागले. 1999 साली ही ट्रॉफी बनविण्यात आली होती. वर्ल्ड कप जिंकणाऱया संघाला या ट्रॉफीची प्रतिकृती देण्यात येते. मूळ ट्रॉफी आयसीसीकडेच ठेवण्यात येते.
आम्हाला ‘अंडरडॉग्स’ म्हणून संबोधले जात आहे. कोणाचे आमच्याकडे लक्ष असो वा नसो आमचे लक्ष फक्त सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यावर असणार आहे. कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या संघांनी दिग्गज संघांना हरवलेले सर्वानीच अनुभवले आहे. त्यामुळे आम्ही तयार आहोत. आतापर्यंत वेगवेगळ्या खेळपट्टय़ांवर खेळाडूंनी आपली चमक दाखवलीय. उद्याही तोच प्रयत्न राहील.- केन विल्यमसन, कर्णधार, न्यूझीलंड
न्यूझीलंडने ब्रॅण्डन मॅक्कलमच्या नेतृत्वात मागील वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली. तो माझा चांगला मित्र आहे. त्याच्याकडूनच आक्रमक आणि वेगळ्या शैलीचे क्रिकेटचे धडे गिरवलेत. आमचा संघ त्याच थाटात या स्पर्धेत खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत आम्ही सर्वोत्तम खेळ केलाय. उद्याच्या जेतेपदाच्या लढतीत त्याचीच पुनरावृत्ती करावयाची आहे. – ओएन मॉर्गन, कर्णधार, इंग्लंड
उपविजेत्या संघाला मिळणार 14 कोटी
हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया यांना प्रत्येकी 5.6 कोटींचे बक्षीस
एकूण 70 कोटींची बक्षिसे
दृष्टिक्षेपात
- गेल्या 11 वर्ल्ड कपमधील सात स्पर्धांत प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी झालाय, मात्र गेल्या दोन वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान (2011) व ऑस्ट्रेलिया (2015) या संघांनी धावांचा पाठलाग करताना जेतेपदाला गवसणी घातली.
- मागील नऊपैकी सात लढतींमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला हरवले आहे. मात्र लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत न्यूझीलंडने इंग्लंडला दोन वेळा हरवण्याची करामत करून दाखवलीय.
- लॉर्डस् येथील क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या चार अंतिम सामन्यांमध्ये ‘अवे’ ड्रेसिंग रूममध्ये वास्तव्य असलेल्या संघांनी चॅम्पियन होण्याचा मान संपादन केलाय. उद्या मात्र इंग्लंडचा संघ ‘होम’ ड्रेसिंग रूममध्ये राहणार आहेत.
जागतिक क्रीडा क्षेत्रातील इतर स्पर्धांमधील बक्षिसे खालीलप्रमाणे
फिफा वर्ल्ड कप –2786 कोटी
फेडेक्स कप –487.6 कोटी
यूएस ओपन – 396 कोटी
विम्बल्डन – 341 कोटी
फ्रेंच ओपन – 334 कोटी
वर्ल्ड कप (क्रिकेट) – 70 कोटी
आजची फायनल लढत
इंग्लंड वि. न्यूझीलंड
लंडन, दुपारी 3 वाजता























































