भांडुप, मुलुंडमध्ये अजगरांचा सुळसुळाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुसळधार पावसामुळे पूर्व उपनगरात सरपटणाऱया प्राण्यांचा सुळसुळाट झाला आहे. पावसाच्या पाण्यामुळे हे प्राणी मानवी वस्त्यांमध्ये वाहून येत आहेत. भांडुप आणि मुलुंड परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये तीन अजगर पकडले गेले. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. भांडुप येथील साई हिल परिसरात आणि मुलुंड येथील एल. बी. एस. मार्गावरील निर्माणाधीन इमारत तसेच आस्था रुग्णालयाच्या बाजूच्या झाडीमध्ये अजगर आल्याची माहिती तेथील रहिवाशांकडून प्लॅण्ट ऍण्ड ऑनिमल्स वेल्फेअर सोसायटी (पॉज) आणि अम्मा केअर फाऊंडेशन या पशूप्रेमी संस्थांच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित सोसायटय़ांमध्ये जाऊन तीन अजगरांची सुटका केली. ते अनुक्रमे आठ फूट, साडेसात फूट आणि दीड फूट लांबीचे होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निसर्गात सोडून देण्यात आले, अशी माहिती मुंबईचे मानद् वन्य जीवरक्षक सुनिश सुब्रमण्यम यांनी दिली.