आठ दिवसांत अनुदानाची रक्कम द्या, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-with-farmer

सामना प्रतिनिधी। धुळे

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत खरीप उत्पादन घेण्यासाठी शेतकऱयाला सहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचे धोरण आहे. पेरणीच्या वेळी दोन हजार रुपये देण्याचे सरकारने सांगितले. पण यंदा निरनिराळय़ा त्रुटी काढून शेतकऱयांचे प्रस्ताव परत पाठविले जात आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱयांना शासनाच्या योजनेतील अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. येत्या आठ दिवसांत अनुदानाची रक्कम शेतकऱयांना मिळाली नाही तर तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल. त्यानंतर सर्वत्र तालुक्यात चक्काजाम आंदोलन होईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

जिल्हय़ात यंदा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. पण काही शेतकऱयांनी पेरण्या करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने विशेष योजनेतून पाच एकर क्षेत्र असणाऱया शेतकऱयांना खरीप हंगामासाठी तीन टप्प्यांत सहा हजार रुपयांचे अनुदान देऊ केले. खरिपाची पेरणी होत असताना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळणार असे ठामपणे सांगण्यात आले. पण जिल्हय़ातील तुटपुंज्या शेतकऱयांनी पेरणी केली आणि अनुदानाच्या रकमेची मागणी केली. परंतु शासकीय यंत्रणा निरनिराळय़ा त्रुटी काढून प्रस्ताव माघारी पाठवत आहे. तलाठी शेतकऱयांकडून बँकेच्या पासबुकची नक्कल घेतो. त्यावेळी त्या नकलेवर बँकेचा खाते क्रमांक बरोबर असतो. मग तलाठी तयार करत असलेल्या प्रस्तावावर बँक खाते क्रमांक का चुकतो. याला जबाबदार कोण? प्रशासनातील भोंगळ कारभाराचा फटका नेहमीच शेतकऱयांना का बसतो? असा प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला. असाच अनुभव बोंडअळीने त्रस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱयांनीदेखील घेतला आहे. खरिपासंदर्भातील अनुदानाचे दोन हजार रुपये शेतकऱयांना आठ दिवसात मिळाले नाही तर शिवसेना तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल. तसेच तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन होईल. त्यावेळी निर्माण होणाऱया परिस्थितीला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असे स्पष्टीकरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी दिले.

जिल्हाधिकारी देवराज गंगाथरन यांच्याशी यावेळी हिलाल माळी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी चर्चा केली. निवेदन देतांना विलास चौधरी, देवराम माळी, कैलास पाटील, प्रवीण पाटील, सुधाकर पाटील, प्रकाश वाघ, चेतन माळी, प्रवीण खैरनार, योगेश पाटील, संजय बनसोडे, दिगंबर जाधव, समाधान बोरसे, बाळासाहेब देसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.