कोकणातील सामूहिक भट लावणी व नांगरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

‘चल माझ्या राजा चल रं सर्ज्या, लिंगोबाचा डोंगुर….’ अशी स्फूर्ति गीतं गात आज माखजन येथे सामूहिक भट लावणी व नांगरणी कार्यक्रम संपन्न झाला. भर पावसात हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातून शेकडो शेतकरी रसिक हजर होते.

हा कार्यक्रम श्री वाघजाई मानोब बळीराजा शेतकरी मंडळ हेमणवाडी तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावठी बैलजोड्यांमध्ये कडवईच्या राजाराम चव्हाण आणि घाटी जोड्यांमध्ये खेरशेतच्या सोमा बुध्दाजी बेंडल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ६० घाटी व गावठी बैलजोड्या सहभागी झाल्या. सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला कै. अनुराधा निकम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवसभर माखजन भागात पावसाचा जोर कायम होता. असे असतानाही भरपावसात शेताच्या बांधावर उभं राहून सलग ८ तास शेकडो शेतकऱ्यांनी कोणतीही तमा न बाळगता या सामूहिक नांगरणी कार्यक्रमाचा आंनद घेतला. वैभव पवार यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने उपस्थित शेतकरी रसिक मंत्रमुग्ध झाले.

आमदार सदानंद चव्हाण यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी सभापती कृष्णा हरेकर, बविताचे अध्यक्ष सुरेश भायजे, जि. प. माजी सदस्य दीपक जाधव, माखजनच्या सरपंच दीपा खातू, गावकर विष्णू हेमण, संजय चव्हाण, नाना कांगणे, मयु बाष्टे, अजीज आलेकर, काका तांबे, बंधू तांबे, आदी मान्यवर तसेच माखजनमधील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

घाटी बैलजोड्यांमध्ये सोमा बुध्दाजी बेंडल (प्रथम), मारुती ओकटे (द्वितीय), अनंत कुळ्ये (तृतीय), भावेश कुंभार(चतुर्थ) व प्रसाद सुवरे (पाचवा) तर गावठी जोड्यांमध्ये राजाराम चव्हाण (प्रथम), मनोहर दुर्गावले( द्वितीय), रवींद्र मते( तृतीय), महेश किंजळकर (चतुर्थ) आणि बागवाडी ग्रुप देवरुख यांनी पाचवा क्रमांक पटकावला. विजेत्यांना माजी आमदार डॉ. विनय नातू, कृष्णा हरेकर, सुरेश भायजे तसेच मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.