हिंदुस्थानात पाचपैकी एक व्यक्ती मानसिक रुग्ण;नैराश्याची समस्या गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानात शारीरिक विकारांबरोबरच मानसिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कार्पोरेट क्षेत्रात काम करताना येणारा ताण, जेवणाबरोबरच झोपण्याच्या अनियमित वेळा, आधुनिक जीवनशैली यामुळे पाचपैकी एक हिंदुस्थानी व्यक्ती मानसिक व्याधीने ग्रस्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. याचपार्श्वभूमीवर व्होकहार्ट फाऊंडेशनने शुक्रवारी मानसिक ताण आणि काॉर्पोरेट क्षेत्रातील सामाजिक जबाबदारी (सीएसआर) या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले होते.

बिर्ला समूहाच्या निरजा बिर्ला, आदित्य बिर्ला , व्होकहार्ट फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. हुजैफा खोराकवाला यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्थेचे मान्यवर यावेळी उपस्थित होते. या चर्चासत्रात सामाजात वाढीस लागलेल्या मानसीक ताणावर सर्वच ज्येष्ठांनी चिंता व्यक्त केली. तसेच मानसिक आजारांसोबत समाजात जागृकता वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपयायोजनांवर खोराकवाला यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती बिर्ला यांनीही यावेळी मानसिक व्याधींबोबत समाजात जागृकता आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी वोकहार्टचे संचालक असिमा सत्यार्थी यांनी समाजात मानसिक आजाराप्रती जागृकता आणण्यासाठी वोक्हार्ट कटीबद्ध असल्याचे जाहीर केले.

यावेळी NIMHANS ने केलेल्या वैद्यकिय संशोधनाच्या अहवालाचा हवाला देण्यात आला. त्यानुसार हिंदुस्थानात 13.7% लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. तर 10.6% रुग्णांना तात्काळ उपचारांची आवश्यकता आहे. आपल्या देशात मानसिक आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. “हिंदुस्थानातील सर्वात मोठी लोकसंख्या मानसिकरित्या त्रस्त आहे. प्रत्येक पाच हिंदुस्थानींपैकी एकाला काही मानसिक आजार आहेत. ज्यामध्ये निराशा सर्वात महत्वाची आहे. हिंदुस्थानात 15 ते 29 वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे. आम्ही नजीकच्या भविष्यात मानसिक आरोग्य धोरणे आणि कार्यक्रम अंमलबजावणी आणि मानसिक आरोग्य सेवेमध्ये वाढत्या गुंतवणूकीवर भर दिला पाहिजे, असे वॉकहार्ट फाऊंडेशनचे संचालक असिमा सत्यार्थी यांनी सांगितले. मानसिक आजार, जसे मूड डिसऑर्डरचे प्रमाण पुरुषांमध्य़े जास्त आहे.

18 वर्षांवरील 22.4 टक्के नागरिक तंबाखू आणि मद्याच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्के व्यक्तींमध्ये आत्महत्येचे विचार येतात. किशोरवयीन मुलांमध्ये (13 ते 17 वर्षे) मानसिक आजाराचे प्रमाण जास्त आहे. त्यात नैराश्याचे प्रमाण 7.3 टक्के आहे. देशात 150 लाख लोक मानसिक आजारामुळे त्रस्त आहेत. मात्र, त्यापैकी केवळ 10-12 टक्के लोक औषधोपचार घेतात. 15 ते 29 या वयोगटातील मुलांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे, असे खोराकवाला यांनी सांगितले. तसेच व्यसनामुळेही मनासिक व्याधींच्या रुग्णात वाढ होत असल्याचे व त्यातही पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे खोराकवाला म्हणाले.