
सामना प्रतिनिधी । मुंबई
गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान काढण्यात येईल. त्यामध्ये बॉम्बे डाइंगमधील गिरणी कामगारांच्या 3 हजार 364 तर श्रीनिवास गिरणीतील 482 घरांचा समावेश असेल, असे आश्वासन म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले.
गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीच्या संदर्भात गिरणी कामगार कृती समितीच्या नेत्यांसोबत बैठक झाली. ऑगस्ट महिन्यात 5090 गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी कशी व कधी काढणार याबाबत गिरणी कामगारांच्या मनांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान ही लॉटरी काढली जाईल. बॉम्बे डाइंग व श्रीनिवास गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढल्यानंतर एमएमआरडीएच्या 1 हजार 244 घरांची लॉटरी काढली जाईल. या घरांच्या किमतींमध्ये बदल होणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कृती समितीसोबत बैठक
लॉटरी लागलेल्या कामगारांना घरे मिळवण्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत येत्या बुधवारी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱयांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन यावेळी उदय सामंत यांनी दिले. या शिष्टमंडळात प्रवीण घाग, गोविंदराव मोहिते, जयप्रकाश भिलारे, नंदू पारकर, आदींचा समावेश होता.


























































