
सामना ऑनलाईन। लखनौ
उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्हयात शरयू नदीत रविवारी एक प्रवासी बोट उलटली. यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य 15 प्रवाशांचा शोध सुरू आहे. या बोटीत एकूण 20 जण प्रवास करत होते. हे सर्वजण शेतकरी असून शेतीची कामे करण्यासाठी पलिकडच्या गावात जात होते. दरम्यान , बोट उलटल्यानंतर 4 शेतकऱ्यांनी पोहत किनारा गाठला व आपले प्राण वाचवले. दरम्यान, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने बोट उलटली असे सांगण्यात येत आहे.
हिंदुस्थान-नेपाळ सीमेजवळील लोकहीब गावातील 20 शेतकरी रविवारी सकाळी बाजूच्या गावात जाण्यासाठी बोटीतून निघाले होते. बोट मध्यावर येताच हलू लागली व एका बाजूला कलंडली. बोट उलटताच सर्वजण पाण्यात पडले. ज्या शेतकऱ्यांना पोहता येत होते त्यांनी पोहत नदी किनारा गाठला. तर अनेकजण बेपत्ता झाले आहेत. यादरम्यान, पाण्यात बुडाल्याने मृत्यू झालेल्या एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळला आहे. पोलीस व बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध सुरू आहे. संततधार पाऊस आणि नेपाळमधील नद्यांनी ओलांडलेली धोक्याची पातळी यामुळे शरयू नदीपात्रातही पाण्याची पातळी वाढली आहे. गावकऱ्यांना दुसऱ्या गावात जाण्यासाठी शऱयू नदी ओलांडूनच जावे लागते. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नागरिकांना नदीतून प्रवास करावा लागतो. अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.























































