पवारांनी आत्मचिंतन करावे! राष्ट्रवादीचे आणखी नेते भाजपमध्ये येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात आमदार भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहे, परंतु त्यातल्या काही निवडक लोकांनाच भाजपमध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच ज्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे अशा कोणालाही पक्षात प्रवेश देण्यात येणार नाही’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हणाले.

विधासभेच्या तोंडावर अनेक नेते पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. याच दरम्यान सरकारी संस्थांचा (सीबीआय, ईडी) गैरवापर करून लोकप्रतिनिधींना फोडण्यासाठी केला जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. याला मुख्यमंत्र्यांनी रविवारी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहण्यास नेते का तयार नाही याचे शरद पवारांनी आत्मचिंतन करावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच विरोधी नेत्यांना भाजपचं आकर्षण असून आम्हाला कोणामागे धावण्याची गरज नाही. विरोधी पक्षाचे लोकंच भाजपमध्ये येत आहे. आम्ही दबावाचे राजकारण करत नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गेल्या पाच वर्षात शरद पवार यांच्या पक्षाच्या आणि नेत्यांच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारने मदत केली. कारण भाजपला दबाव टाकून लोकं घेण्याची गरज नाही. आमच्यामागे लोकं आहेत. भाजपला विरोधी पक्ष फोडण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.