
सामना प्रतिनिधी । खेड
शुक्रवारपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी उसंत घेतली असली तरी कोकणाला असलेला पुराचा धोका अद्याप टळलेला नही. गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी धरण पावसांमुळे क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कोकणातील बहुतांशी धरणे मात्र ओव्हरफ्लो झाली आहेत. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असल्याने यंदा पाणी टंचाईची भीषणता कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.
यंदा वरुणाचे आगमन उशिराने झाले हे जरी खरी असले तरी सुरवात केल्यापासून पाऊस अगदी मनासारखा कोसळत आहे. कोसळणारा पाऊस शेतीला आवश्यक असावा असाच पडत असल्याने बळी राजा समाधानी आहे. वेळेत लावणी उरकल्याने यंदा पीकही चांगले येण्याची शक्यता आहे त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहावयास मिळत आहे.
कोकणात मोठी समस्या आहे ती पाणी टंचाईची. गेली अनेक वर्ष कोकणी जनता पाणी टंचाईच्या वणव्यात होरपळून निघत आहे. एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला तर टंचाईची तीव्रता आणखी वाढते. आणि कोकणातील नद्या नाले, सार्वजनिक पाणवठे कोरडेठाक होतात. मात्र यावर्षी टंचाईग्रस्त गावांना पाणी टंचाई पासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणावरचे पाणी-बाणी चे संकट काही प्रमाणात काही होईना कमी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, गडनदी, अशा कार्यही महत्वाच्या नद्या आहेत. या नद्यांना मिळणाऱ्या अनेक उपनद्याही आहेत. यंदा मुख्य नद्यांसह उपनद्याही दुथडी भरून वाहू लागल्या असल्याने उन्हाळयात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईची तीव्रता नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे.




























































