मर्क्समधील 99 कामगारांचे बेमुदत उपोषण; आत्मदहनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण येथील एपीएम टर्मिनल (मर्क्स ) कंपनीमधील 18 महिन्यांपुर्वी कमी करण्यात आलेल्या 99 कामगारांनी पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून कुटुंबीयांसह आरपारची लढाई सूरू केली आहे. एपीएम (मर्क्स) कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळच कामगारांनी साखळी उपोषण सूरू केले आहे. गरज भासल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीच्या हद्दीत एपीएम टर्मिनल (मर्क्स ) ही डेन्मार्क देशातील मल्टीनॅशनल कंपनी आहे. 25 वर्षीपासून कार्यरत असलेल्या कंपनीत 550 कामगार काम करीत होते. मात्र, कंपनीने फेब्रुवारी 2018 मध्ये 99 कामगारांना तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. कमी केलेल्या कामगारांनी न्याय हक्कासाठी आंदोलन करून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कंपनी विरोधात संघर्षही केला.मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी मध्यस्थी करून कामगारांना कामावर घेण्यासाठी विनंती केली होती. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने या सर्वांची विनंती धुडकावून या 99 कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसही फोडल्या.मात्र, कंपनीच्या अधिकारी आणि कामगारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे काम करणे अवघड झाल्याची ओरड करीत कंपनीने दोन महिन्यापूर्वी टाळेबंदी जाहीर केली होती. त्यामुळे काम करीत असलेल्या सुमारे 450 कामगारांचे संसार उघड्यावर आले होते. डीसीपी अशोक दुधे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कंपनीने 15 दिवसांनी टाळेबंदी उठवली होती.त्यानंतर 450 कामगारांना कामावर घेऊन कंपनीने काम सुरु केले होते.मात्र कमी करण्यात आलेल्या 99 कामगारांना सापत्नपणाची वागणूक देत कामावर घेण्यास नकार दिला होता.

25 वर्षे सेवा केल्यानंतर या 99 कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्याने अत्यंत हलाकीत हे कामगार आपले जीवन काढत आहेत. त्यामुळे या कामगारांनी आत्ता आरपारची लढाई सूरू केली असून एकतर नोकरी तरी घेवू अन्यथा बेमुदत उपोषण करून जीव देवू त्यातून काही निर्णय झाला नाही तर कंपनीच्या गेटसमोर आत्मदहन करू अशी भूमिका या कामगारांनी घेतली आहे.