
सामना ऑनलाईन,मुंबई
पुनर्विकास प्रकल्पात 19 व्या मजल्यांपर्यंतच्या इमारतीभोवती 7.5 मीटर मोकळी जागा सोडल्यास आणि पंधराव्या मजल्यापर्यंतच्या इमारतींभोवती 6 मीटर मोकळी जागा सोडल्यास आता फायर सेफ्टी लिफ्ट लावण्याची गरज भासणार नाही. डिसेंबर 2017 च्या पालिकेच्या निर्णयानुसार 70 मीटर उंच किंवा 22 मजल्यांपर्यंतच्या इमारतींमध्ये 9 मीटर मोकळी जागा सोडणे बंधनकारक होते. परिणामी मोकळी जागा आणि फायर सेफ्टी लिफ्टच्या अटीमुळे मुंबईतील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडले होते. मात्र पालिकेच्या नव्या धोरणामुळे मुंबईतील अनेक छोटे खासगी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
मुंबईतील कुठल्याही पुनर्विकास प्रकल्पांना पालिकेची मंजुरी घ्यावी लागते. यामध्ये फायर सेफ्टीबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर विकासक-रहिवाशांना पुढील कार्यवाही करता येते. मात्र 2017 च्या तत्कालीन आयुक्तांच्या निर्णयामुळे अनेक छोटे खासगी पुनर्विकास प्रकल्प रखडले होते. आगीची दुर्घटना घडल्यास इमारतीच्या ठिकाणी फायर इंजिन पोहोचता यावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अनेक छोटय़ा प्रकल्पांमध्ये 6 ते 9 मीटर जागा सोडणे खासगी प्रकल्पांना व्यवहार्य नसल्याने असे शेकडो प्रकल्प रखडले होते. शिवाय इमारतींमध्ये रहिवाशांना फ्लॅटमध्ये जाण्या-येण्यासाठी आवश्यक लिफ्ट बसवण्यात आल्या तरी अशा फायर लिफ्ट बसवणे शक्य नव्हते. मात्र पालिकेच्या नव्या धोरणामुळे हे खासगी प्रकल्प आता मार्गी लागणार आहेत.
असे आहे धोरण
- 58 ते 70 मीटर उंच किंवा 19 ते 22 माळ्यांच्या इमारतींसाठी 9 मीटर मोकळी जागा सोडल्यास फायर लिफ्टची गरज नाही, मात्र 6 मीटर मोकळी जागा सोडल्यास फायर लिफ्ट आवश्यक.
- 45 ते 58 मीटर उंच किंवा 15 ते 19 माळ्यांच्या इमारतींभोवती 7.5 ते 9 मीटर मोकळी जागा सोडल्यास फायर लिफ्टची गरज भासणार नाही. मात्र फक्त 6 मीटर जागा सोडल्यास फायर लिफ्ट अनिवार्य.
- 32 ते 45 मीटर उंच किंवा 9 ते 15 माळ्यांच्या इमारतींना 6 मीटर मोकळी जागा सोडल्यास फायर लिफ्ट लावणे बंधनकारकअशी असावी लिफ्टची क्षमता
- लिफ्टची क्षमता एक हजार किलो वजन पेलणारी किंवा 15 माणसांचे वजन पेलणारी असावी.
- संबंधित लिफ्टसाठी वापरण्यात येणारी वायरिंग फायरप्रूफ असावी. वीजपुरवठा खंडित झाल्यास बॅकप पॉवर सप्लाय तैनात असावा.
- लिफ्ट आणि लिफ्टचे दरवाजे दोन तास आगीच्या संपर्कात राहिले तरी त्यांच्यावर आगीचा परिणाम होता कामा नये.
- लिफ्ट ही पारदर्शक आगीचा कोणताही परिणाम होणारी नसावी.
- संबंधित लिफ्ट कार्यक्षम राहण्यासाठी वेळोवेळी तिचा वापर केला जावा. जेणेकरून लिफ्ट सुस्थितीत सुरू असल्याची खात्री राहील.




























































