लातुरात क्रीडा संकुलाच्या प्रवेशासाठी द्यावे लागणार शुल्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर येथील क्रीडा संकुलामध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना आता मोफत प्रवेश करता येणार नाही. १ ऑगस्ट पासून महिन्यांसाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. संकुलाचे दैनंदिन विद्यूतबील, कामगारांचे मानधन,देखभाल दुरुस्ती, स्वच्छता कामासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लातूरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शासन भिकारी झाले की काय असा सवाल करुन हे प्रवेश शुल्क रद्द करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

जिल्हा क्रीडा संकुलात अनाधिकृत व्यक्ती प्रवेश करुन संकुलातील सुविधांचे नुकसान करीत असल्याचे कारणही दर्शवण्यात आले आहे. दैनंदिन चालण्याच्या व्यायामासाठी येणाऱ्या नागरीकांना प्रतिमहा ५० रुपये, तीन महिन्यांसाठी ८५ रुपये, सहा महिन्यांसाठी १६० रुपये तर वर्षभरासाठी ३०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. त्यासाठीचा पास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून देण्यात येणार आहे.

या शिवाय केवळ सायकल घेऊन येणाऱ्या नागरीकांना मोफत पार्किंगची व्यवस्था राहणार आहे. दुचाकीच्या चार तासाच्या पार्किंगसाठी ५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. चारचाकी वाहनांना क्रीडा संकुलाच्या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. जमा होणाऱ्या निधीमधून संकुल परिसर स्वच्छ ठेवणे, परिसरात हिरवळ निर्माण करणे, सुविधांमध्ये सुधारणा करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत असे जिल्हा क्रीडा संकुल समितीच्यावतीने जाहिर करण्यात आलेले आहे.

या निर्णयामुळे लातूरकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासनास भिक लागली की काय असा सवाल उपस्थित करुन फिरण्यासाठी येणाऱ्या नागरीकांकडून शुल्क वसूली करणे अयोग्य असल्याचे म्हटले जात आहे.