तीन दिवसांच्या रिमझिम पावसाने खरीप पीकांना जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, परभणी

परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना काही दिवसांपुरता दिलासा मिळाला आहे. या पावसाने खरीप पिकांच्या उत्पादनात थोडीफार भर पडेलही. परंतु, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, हवामान खात्याच्या नव्या अंदाजाप्रमाणे येत्या 48 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाची अवकृपा होती. अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. शुक्रवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून चार दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. एकंदर पावसाळी वातावरण तयार झाले असले तरी मोठा पाऊस झाला नसल्याने जिल्हावासियांचा हिरमोड झाला.

जिल्ह्यातील एकाही धरणामध्ये मुबलक पाणीसाठा होईल, असा पाऊस झाला नाही. परभणी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. आजपर्यंत झालेल्या पावसामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाण्याचा प्रश्न कायम आहे. जिल्हावासियांना आगामी उन्हाळ्यातील पाण्याची चिंता लागलेली आहे. सोमवार आणि आज मंगळवारी या सलग दोन दिवशी दिवसभर जिल्ह्यात रिमझीम पाऊस सुरुच होता. दिवसभरात एकाही वेळा पावसाचा जोर वाढला नसला तरी ढगाळ वातावरण आणि रिझमीम पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे रस्ते चिखलमय झाल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. शहरातील अनेक कॉलन्यामधील नाल्या तुंबल्यामुळे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली असल्याचे चित्र पहावयास मिळाले. महानरपालिकेने पावसाळ्यापूर्वीचे कामे गांभिर्याने न केल्यामुळे तसेच पाण्याची विल्हेवाट लावली नसल्याने नागरिकांना अनेक समास्यांना सामोरे जावे लागत आहे. साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन अनेक आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला असून रविवारी जिल्ह्यात हलका पाऊस झाला. दुपारी 12 वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊसास सुरुवात होऊन आजतागायत अशीच परिस्थिती जिल्ह्यासह तालुक्यामध्ये पहावयास मिळाली. या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे. दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. जिल्हाभरात सर्वदूर भीज पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस रिमझिम पावसामुळे प्रथमच पावसाळी वातावरण जिल्हावासियांना अनुभवायास मिळाले. या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांना दिलासा मिळाला आहे. दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने ही पिके माना टाकत होती. कधी मध्यम तर कधी रिमझीम पाऊस होत असल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 178.62 मि.मी. पाऊस झाल. त्यात परभणी 2.25 (157.42), पालम 3.67 (143.42), पूर्णा 4.60(202.40), गंगाखेड 6.75 (165.75), सोनपेठ 4.00(185.00), सेलू 3.80 (156.80), पाथरी 2.76 (174.33), जिंतूर 3.33 (192.33), मानवत 3.67 (230.00) मानवत तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वदूर पाऊस झाला असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. असे असले तरी तालुक्यातील पाणीप्रश्न अद्यापपर्यंत कायम आहे. कारण अजूनही तालुक्यात 3 गावात टँकर व 2 गावात अधिग्रहण केलेल्या जलस्त्रोतातून पाणीपुरवठा केला जात आहे. यावरून पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी पाणीटंचाई कायम आहे.

मानवत तालुक्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पिकांनी मान टाकायला सुरुवात केली होती. या परिस्थितीत शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पिकांना जीवदान दिले. मात्र तालुक्याचा पाणीप्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे. तालुक्यातील हत्तलवाडी, पाळोदी, सावळी या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर वझुर खुर्द आणि रामेटाकळी या गावात खाजगी बोअर व विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून जुलै महिन्यापासून पाऊस सुरू होत असून दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी कमी होताना दिसते. तालुक्यात 1 जूनपासून आतापर्यंत तीन मंडळात एवूâण सरासरी 25.33 टक्के पाऊस झाला असून तो गतवर्षीच्या तुलनेत अगदी कमी आहे. जर आगामी काळात चांगला पाऊस झाला तर तालुक्याचा पाणीप्रश्न मिटणार आहे. परंतु तोपर्यंत पाणीटंचाई संदर्भात उपाय योजना करण्याची गरज आहे. विशेषत: तालुक्यातील काही गावात वीज गुल असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बोरी – जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरात 26 व 27 जुलै रोजी पाऊस झाल्यामुळे होरपळत असलेल्या पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला; परंतु पाऊस न झाल्यामुळे खरिपाची पेरणी वाया जाते का काय? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. दीड महिन्यानंतर पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बोरी व परिसरात विहिरी, हातपंप कोरडे पडले असून गावाची तहान 16 गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. येथील धरणात पाणी अल्प प्रमाणात असल्यामुळे हा साठा एक ते दोन महिने पुरेल एवढा आहे. पुढे मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्यास बोरीकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोर जावे लागले. पाऊस नसल्यामुळे बोरी येथे 75 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. या कालच्या पावसाने उर्वरित 25 टक्के शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. या उशिरा झालेल्या पावसामुळे दहा ते पंधरा टक्के शेतकरी पेरणी विना राहतील. रब्बीची पेरणी करणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.