
सामना प्रतिनिधी । मुंबई
सध्या शिधावाटप दुकानांमध्ये बायोमेट्रिक ओळख पटवूनच धान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी ई पॉस म्हणजेच (Adhaar Enabled Public Distribution System) मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनद्वारे धान्य वितरणामुळे तब्बल 3.64 मेट्रिक टनांहून अधिक धान्याची बचत झाली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्य शासनाने भर दिल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. ई पॉस मशीनद्वारे केरोसीनचे वाटप करण्यात येत असल्यामुळे केरोसीनची सुमारे 60 टक्क्यांपर्यंत बचत झाली आहे. दर महिन्याला सव्वा कोटी कुटुंबे आधार प्रमाणीकरण करून धान्य खरेदी करत असल्यामुळे पारदर्शक व्यवहार होत आहेत. ई पॉस मशीनवरील विक्री या संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध असल्याने विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आली आहे. काळाबाजार रोखण्यास मदत होण्याबरोबरच रेशन दुकानदारांच्या उत्पन्नवाढीलाही प्रोत्साहन मिळाले आहे. जून 2017 पासून सर्व शिधावाटप दुकानांमधून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात असून 1 मे 2018 पासून आधार प्रमाणीकरण करूनच धान्य वितरण करण्यात येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळय़ाचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थींनाच व्हावे यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई पॉस मशीन बसविण्यात आले आहे. या ई पॉसमुळे लाभार्थीची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.





























































