
सामना प्रतिनिधी। अलिबाग
कारंजा येथून अलिबाग वरसोली येथे मच्छीमारीसाठी आलेली बोट सकाळी पाच वाजता समुद्रात बुडाली. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झालेली नाही. दरम्यान, बोट बुडू लागताच बोटीतील आठ कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारली व पोहत किनारा गाठला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वसंता पाटील, धावू तांडेल, गजानन जोशी, नितीन ठाकूर, उमाजी पाटील, रुपेश पाटील, नारायण कोळी, परशुराम पाटील अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व जण केळवणे, उरण येथील रहीवासी आहेत.
हे सर्वजण राजेश नाखवा यांच्या मालकीच्या बोटीने मच्छीमारी करण्यासाठी निघाले होते. या मच्छिमार बोटीत नाखवा, तांडेल, खलाशी यासह पाचजण होते. बोट वरसोली बंदरातील खांदेरी व चाहूल खाद्या येथे आली असता अचानक बंद पडली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बोट चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र बोट सुरू झाली नाही. त्यामुळे नाखवाने बोटीचा नांगर टाकला. मात्र पाण्याच्या हिसक्याने नांगरही निघून गेला. त्यानंतर पाण्याच्या लाटेवर बोट पुढे जाऊन खडकावर आपटली.
खडकावर आपटल्याने बोट बुडू लागली. यामुळे बोटीतील कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट घालून पाण्यात उड्या मारल्या. बोटीतील मासे साठवून ठेवण्याच्या बॉक्सवर बसून व बोयाच्या सहाय्याने आठही जण वरसोली समुद्र किनारी सुखरूप पोहचले. या दुर्घटनेनंतर पोलीस, वरसोली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी आठही जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र बोट बुडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
मच्छीमारीला पावसाळ्यात बंदी असताना व हवामान विभागाने पाच दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये अशा सूचना असतानाही मच्छिमार मच्छीमारीला जात आहेत. त्यामुळे आता या दुर्घटनेनंतर मच्छीमारी करणाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

































































