दुरुस्ती, नवीन इमारत बांधण्याच्या कालावधीत संक्रमण शिबिरात शाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

सामना ऑनलाईन । मुंबई

शाळेची दुरुस्ती, नवीन इमारत बांधण्याच्या कामात शाळा बंद राहिल्याने संबंधित शाळेतील अनेक विद्यार्थी इतर शाळांत प्रवेश घेतात. यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थीसंख्या कमी होत आहे. त्यामुळे पटसंख्या राखण्यासाठी शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारत बांधताना जवळच्याच परिसरात संक्रमण शिबीर बांधून शाळा सुरू ठेवण्याचे  निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या 450 शाळांच्या इमारती आहेत. या शाळांमध्ये सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र इंग्रजी माध्यमाच्या वाढलेल्या प्रस्थामुळे पालिका शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यात शाळांची दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधताना विद्यार्थी पालिकेची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जात असल्यामुळेही पटसंख्या कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच संक्रमण शिबीर बांधून शाळेच्या परिसरातच संक्रमण शिबीर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मालाड येथे ट्रांझिस्ट कॅम्प बांधला जात असल्याचे अंजली नाईक यांनी सांगितले.

35 शाळा धोकादायक

पालिकेच्या 30 ते 35 शाळा धोकादायक असल्याचे समोर आले. यात जुहू, देवनार, नेहरू नगर, आगरवाडी या शाळा 2013-14पासून पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यामधील अनेक शाळांची दुरुस्ती सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमधील दरवाजे, खिडक्या तुटल्या असल्यास त्या वॉर्डस्थराकर दुरुस्त कराव्यात. मोठय़ा दुरुस्ती असल्यास त्यासाठी शाळा पायाभूत सुविधा विभाग, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित शाळेमधील मुख्याध्यापक, शिक्षक यांची संयुक्त समिती स्थापन करून दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीचा निर्णय घ्यावा, असे निर्देश अंजली नाईक यांनी शिक्षण विभागाला दिले.