अनाथालयाची तोडलेली भिंत बिल्डरने बांधली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । डोंबिवली

इमारतीसाठी जननी आशीष अनाथालयाची संरक्षक भिंत तोडल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच बांधकाम व्यावसायिकाची चांगलीच धावपळ उडाली. सर्व स्तरातून टीकेची झोड उठू लागल्याने बिल्डरने पुन्हा भिंत बांधून दिली असून त्यामुळे अनाथालय प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

कल्याण रोडवर डोंबिवली जिमखान्याजवळ ‘जननी आशीष’ नावाची अनाथ मुलांचे संगोपन करणारी संस्था आहे. काही दिवसांपूर्वी संस्थेशेजारी एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम सुरू केले. मात्र त्यासाठी त्याने संस्थेची संरक्षक भिंत तोडली. त्यामुळे येथील बालकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रधान यांनी बांधकाम व्यावसायिकाला वारंवार याबद्दल विचारले, त्यावेळी त्याने मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम करत असल्याचे सांगून भिंत बांधण्यास सपशेल नकार दिला. यासंबंधीचे वृत्त 22 जुलैला दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच सर्व स्तरातून व्यावसायिकांवर टीका होऊ लागली. त्यामुळे अखेर बिल्डरने भिंत बांधून दिली आहे.