
सामना प्रतिनिधी । परभणी
नव्या महाराष्ट्राची सुरुवात मला परभणी पासून करायची आहे. कारण परभणी सारखी भगव्यावर प्रेम करणारी जनता मी कुठेही पाहिलेली नाही. माझेही परभणीवर तेवढेच प्रेम आहे. प्रत्येक वर्षी मी परभणीला येतच असतो. दुष्काळमुक्त, कर्जमुक्त, बेरोजगारी मुक्त, हिरवागार आणि भगवामय, सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र घडविताना त्याची सुरुवात परभणीतून केली जाईल, अशी ग्वाही शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे दिली.
मराठवाडा टप्पा दोन जन आशीर्वाद यात्रेनिमित्त शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात होते. काल शुक्रवारी पालम, गंगाखेड, पोखर्णी नृ., पाथरी, मानवत, सेलू येथे जनतेशी संवाद साधल्यानंतर शनिवारी परभणीतील नूतन महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर त्यांनी जनतेशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन केले. जवळपास 200 पेक्षा अधिक नामांकीत कंपन्या परभणीत आज सुशिक्षितांना रोजगार देण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्या होत्या. उद्घाटनानंतर आदित्य ठाकरे यांनी संयोजक डॉ. राहुल पाटील यांच्या प्रास्ताविकातील प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर पाऊस पडल्याचा धागा पकडत माझा पायगुण चांगला असून मी मुंबईतला पाऊस सगळीकडे पडावा, यासाठी बॅग मध्ये घेऊन फिरतो, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
आपली ही जन आशीर्वाद यात्रा काही लोकांना राजकीय यात्रा आहे, असे वाटते. परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी ही आशीर्वाद यात्रा काढली असून जनतेच्या मनात नेमके काय आहे, हे पाहण्यासाठी आणि तरुणांची साथ मिळविण्यासाठी, मतदारांचे आभार मानण्यासाठी ही यात्रा आहे. जनतेचा प्रतिसाद खुप चांगला आहे. चार-चार तास उशिर झाला तरी जनता माझी वाट पाहते. आपल्या मागण्यांचे निवेदन देते. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. म्हणूनच निवेदनांची संख्या माझ्याकडे जास्त आहे. परभणीत मी दरवर्षी येतो. परभणी जिल्ह्यातील जनतेचे भगव्यावरील प्रेम मला माहिती आहे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठीची सुरुवात यामुळेच मी परभणीतून करणार आहे. चेहरे बदलले परंतु, परभणीकर जनता बदलली नाही. यामुळे माझेही परभणीवर तेवढेच प्रेम आहे, अशा भावनाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे संयोजक तथा शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील म्हणाले, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचे काम करणारी आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे जनता एका नव उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पाहत आहे. त्यांचे विचारही जनतेला पटत आहेत. त्यांच्या या जनआशिर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यांच्याकडे भविष्यात देशाचे नेतृत्व येईल. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा व रोजगार युक्त व्हावा असा नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न आदित्य ठाकरे यांचे असून त्या दिशेने आपले पहिले पाऊल म्हणून परभणी जिल्ह्यात कृषीवर आधारित उद्योग आपण उभारणार आहोत. त्यासाठीच महिलांसाठी खास सुतगिरणी सोलारवर उभारण्यात आलेली आहे. यापुढेही जनतेसाठी सेवेचे वृत्त हाती घेवून परभणी जिल्ह्यातील चारीही विधानसभा मतदार संघावर भगवा फडकविण्यासाठी आम्ही आहोरात्र परिश्रम घेवू, अशी ग्वाहीही आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
मराठी मुलांना रोजगार मिळाला पाहिजे हा त्यांचा विचार पाहता परभणीत भव्य रोजगार मेळावा आयोजित केला असून २०० कंपन्या आज आलेल्या आहेत. त्यातून ७ हजार ५०० सुशिक्षीत बेकारांना नोकऱ्या मिळणार आहेत. तसेच आजच्या या दिव्यांगाच्या मेळाव्यात सुमारे १ हजार ५०० पेक्षा अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वाटप केले जात आहे. दोन महिन्यापासून रुसलेला पाऊसही आज आदित्य ठाकरे यांच्या पायगुणामुळे जोरदार कोसळलेला आहे. वरुन राजा प्रसन्न झाला आहे. त्यामुळे त्यांचा पायगुण दुष्काळ हटविण्यासाठी महत्वाचा ठरतो, असेही आमदार डॉ.पाटील म्हणाले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर शिवसेनेचे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धनमंत्री अर्जुन खोतकर, माजीमंत्री सचिन आहेर, माजीमंत्री चंद्रकांत खैरे, शिल्पा सरपोतदार, वरुण सरदेसाई, सुमीत भोईर, खासदार संजय जाधव, सहसंपर्वâप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, युवासेना जिल्हा युवाधिकारी अर्जुन सामाले, राजु कापसे पाटील, गंगाप्रसाद आणेराव, विधानसभाप्रमुख माणिक पोंढे, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदकिशोर पाटील, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सखुबाई लटपटे, अंबिका डहाळे, कुसूम पिल्लेवाड आदींसह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास भर पावसातही शिवसेना-युवासेनेच्या कार्यकत्र्यांची प्रचंड उपस्थिती होती. रिपरीप पावसातही आपल्या युवा नेत्याला पाहण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थींनींची लक्षणिय उपस्थिती होती.


























































