
सामना प्रतिनिधी, मुंबई
मस्जिद बंदर येथील व्यावसायिक गाळे असलेल्या चार मजली नवरंग इमारतीला पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीत मोठय़ा प्रमाणात स्टेशनरी तसेच अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, कूलिंग ऑपरेशन सुरू असताना रात्री उशिरा इमारतीत अचानक सिलिंडरचा स्फोट झाला.
मस्जिद बंदरच्या अब्दुल रेहमान स्ट्रीटवर नवरंग इमारत आहे. हा परिसर सदैव गजबलेला असतो. परंतु पहाटे साडेचारच्या सुमारास या इमारतीला आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. तिसऱया मजल्यावर अडकलेल्या तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. इमारत अगदी दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने आगीचा वणवा पसरून शेजारी असलेल्या इमारतींना आग लागण्याची भीती निर्माण झाली होती, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी तसे होऊ दिले नाही. अगदीच कठीण परिस्थिती बनलेली असतानाही आम्ही आगीवर नियंत्रण मिळवले, असे अग्निशमन दल प्रमुख पी. एस. रहांगदळे यांनी सांगितले.






















































