शिवसेनेत मेगाभरती नाही, तर “स्किल”भरती! आदित्य ठाकरे यांची स्पष्टोक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

‘परवा मुंबईत मला प्रश्न विचारला गेला, भाजपा-शिवसेनेमध्ये सध्या मेगा भरती सुरू आहे. तेव्हा मी म्हणालो शिवसेनेत मेगाभरती नाही तर स्कील भरती सुरू आहे. शिवसेनेमध्ये काम पाहून प्रवेश दिला जातो, असे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे बीडमध्ये म्हणाले. तसेच शिवसेनेमध्ये दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांच्या संकल्पना दिर्घकालीन टिकणाऱ्या असतात. क्षीरसागर बंधुंमुळे शिवसेनेला नवे बळ मिळेल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशिर्वाद यात्रा आज परभणीहून बीड जिल्ह्यात दाखल झाली. बीड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या गंगामसला येथे त्यांचे उत्स्फुर्त जंगी स्वागत करण्यात आले. तेथून पुढे ही यात्रा माजलगावकडे निघाली, माजलगाव, तेलगाव, बावी तांडा, वडवणी, घाटसावळी, ढेकणमोहा येथे आदित्य ठाकरे यांचे प्रचंड स्वागत करण्यात आले. बीडमध्ये केएसके महाविद्यालयात त्यांचा आदित्य संवाद हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी तब्बल पाच हजार महिला आणि युवती उपस्थित होत्या. त्यानंतर बीड शहरातील 13 कोटी रूपयाच्या अद्यावत आणि सुसज्ज नव्या बसस्थानकाच्या कामाचा शुभारंभ आज युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, संपर्कप्रमुख आनंद जाधव, आमदार राहुल पाटील उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या मी राज्यभर फिरतो आहे. जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद मिळत आहेत. संवादही होत आहेत. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी जनसेवा करण्यासाठी मी निघालो आहे. जनतेने केवळ प्रेम आणि आशिर्वाद दिले नाहीत तर माझ्यावर विश्वासही दाखवला. मला शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. खरा देव जनतेमध्ये आहे. हेच माझ्या आजोबांनी मला सांगितले आहे. सदैव जनतेची सेवा करणाऱ्या एसटी बसस्थानकाचा शुभारंभ माझ्या हातून होतो आहे हे माझे भाग्य होय.

राज्यात बससेवा सुधारली पाहिजे यासाठी आमची धडपड आहे. जेथे एसटी जाते तेथे विकास जातो, बसची सेवा चांगली आणि परवडणारी असावी याचाही विचार झाला पाहिजे, जसे आपण शहरामध्ये एसी बसमध्ये प्रवास करतो तशा बसेस गावागावात पोहोचल्या पाहिजेत, गावातील पर्यावरण राखण्यासाठी इलेक्ट्रीकल बस सुविधा देणे अत्यंत गरजेचे आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आपणास नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. तो माझ्या स्वप्नातील नाही तर तुमच्या स्वप्नातील म्हणूनच तुमचे स्वप्न तुमच्या आशा, आकांक्षा, तुमच्या इच्छा ,तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी आलो आहे. माझे भाग्य आहे. लोक मला विश्वासाने बोलत आहेत, समस्या मांडत आहेत. त्यांच्या समस्येचे निरसन करणे ही आपली जबाबदारी आहे.

शिवसेनेमध्ये मेगाभरती नाही तर स्कील भरती सुरू आहे असे जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे नजर टाकत आदित्य ठाकरे बोलले. पुढे ते म्हणाले. काम करणाऱ्यांना शिवसेनेमध्ये घेतले जाते. त्यांचे काम बघूनच त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जात आह. शिवसेनेमध्ये दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांच्या कामाच्या संकल्पना दिर्घकालीन टिकणाऱ्या आहेत. क्षीरसागर बंधुंमुळेच शिवसेनेला नवे बळ मिळाले आहे असे म्हणत तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही कोणत्याही जाती, धर्माचे असो आपण सोबत या, नवा महाराष्ट्र घडवू असा निर्धार आपण व्यक्त करू असे ते म्हणाले, यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब आंबुरे, युवा जिल्हाधिकारी सागर बहिर, उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे, संजय महाद्वार, योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

50 वर्षात जे झाले नाही ते साडेचार वर्षात करून दाखवले!
आज बीड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बसस्थानकाचा शुभारंभ होत आहे. निश्चितच ही समाधानाची बाब आहे. गेल्या 50 वर्षात जे झाले नाही ते साडेचार वर्षात आम्ही करून दाखवले. परिवहन खात्याची असंख्य कामे सध्या सुरू आहेत. कोकणामध्ये 29, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 70, मराठवाड्यात 30, विदर्भात 66 बसस्थानकाची कामे सुरू आहेत. एसटी बसेसचे काळवटलेले स्वरूप बदलत आहे. गरिबांची ही एसटी आता रूपडं बदलत आहे. 90 बसस्थानकाची रंगरंगोटी झाली आहे. बीड जिल्ह्यात नेकनूर, कडा-आष्टी, अंबाजोगाई, पाटोदा या बसस्थानकाची कामे सुरू आहेत तर काही कामे लवकरच सुरू होणार आहेत. अनेक बसस्थानके अत्याधुनिक होत आहेत. एसटी खाते तोट्यातून बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवशाही बसची संकल्पना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची होती. अत्यंत यशस्वी उपक्रम आपण राबवू शकलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ही राबवू शकलो. एसटीला हात दाखवणारा प्रवाशी आपला देव आहे. ही संकल्पना मनामध्ये रूजवा, एसटीची प्रगती निश्चित होईल असे ते म्हणाले.

आदित्यजी मन की बात करत नाहीत तर मनकी बात ऐकत आहेत!
मी शिवसेनेमध्ये दाखल झालो, खऱ्या अर्थाने पायवाट पाडली, आता या पायवाटीचा राष्ट्रीय महामार्ग होणार आहे असे म्हणत त्यांनी बीड आणि मराठवाड्यातील भीषण दुष्काळाबाबत उपस्थितांचे लक्ष वेधले. जयदत्त क्षीरसागर पुढे म्हणाले, संपूर्ण राज्यात धुवाँधार पाऊस सुरू असताना बीड जिल्ह्यामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही. भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा कोरडाठाक आहे. ऑगस्ट उजडला असला तरी पिण्याच्या पाण्यासाठी 600 टँकर चालू आहेत. आज मराठवाड्यात दुष्काळ आहे. तो पुढच्या पिढीला नको यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी आणि सिंदफणाच्या खोऱ्यामध्ये उचलून टाकले तर दुष्काळ नष्ट होईल. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पण आग्रही असल्याचे म्हणत ते म्हणाले, हे काम झाले तर माझे मंत्रीपद सत्कारणी लागेल. शिवसेना पक्षप्रमुखांनी रस्त्यावर उतरून पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आवाज उठवला आणि पीक विमा कंपन्या जमिनीवर आल्या. आज आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. ते मन की बात करत नाहीत तर मन की बात ऐकत आहेत. संवादातून शक्ती आणि ताकद निर्माण होत असते असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.