#Ashes2019 लायनचा बळींचा ‘षटकार’, इंग्लंडचा 251 धावांनी दारूण पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बर्मिंघम

बर्मिंघममध्ये झालेल्या पहिल्या अॅशस कसोटीत ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा 251 धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच कसोटींच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 398 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान इंग्लंडला पेलवले नाही आणि त्यांचा डाव 52.3 षटकात 146 धावांमध्ये संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकी गोलंदाज नाथन लायनने बळींचा षटकार लगावला, तर कमिन्सने बळींचा चौकार लगावत त्याला उत्तम साथ दिली.

पाचव्या दिवशी इंग्लंडने आपला डाव बिनबाद 13 धावांवरून पुढे सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रोरी बुर्न्स 11 धावांवर झटपट बाद झाला. यानंतर वोक्स वगळता एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. वोक्सने इंग्लंडकडून सर्वाधिक 37 धावा केल्या. इंग्लंडची आघाडीची फळी फिरकी गोलंदाज लायन आणि कमिन्सने कापून काढली. इंग्लंडचे 6 फलंदाज 97 धावांमध्ये बाद झाले होते. यानंतर वोक्सने थोडीफार फलंदाजी केल्याने पराभवातील अंतर कमी झाले. अखेर त्यांचा डाव 146 धावांमध्ये गारद झाला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने रविवारी आपला दुसरा डाव 7 बाद 487 धावांवर घोषित केला. स्टीव्ह स्मिथने 142, तर मॅथ्यू वेडने 110 धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडकडून बेनस्टोक्सने सर्वाधिक 3, तर मोईन अलिने 2 आणि ब्रॉड व वोक्सने प्रत्येकी 1 बळी घेतला.