
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेस्ट कर्मचाऱयांच्या वेतनकरारासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुकारण्यात आलेला बेस्टचा संप तूर्तास 20 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. बेस्ट कर्मचारी मेळाव्यातील बैठकीत बेस्ट प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी दिली.
2016 पासून रखडलेला वेतनकरार आणि सेवाशर्तीच्या मागण्यांसाठी बेस्टचे कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर जाणार असल्याची नोटीस बेस्ट वर्कर्स युनियनने दिली होती.
जानेवारी महिन्यात युनियनने जवळपास नऊ दिवस संप केला होता. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी प्रशासनाने कर्मचाऱयांना आश्वासने दिली होती ती अद्याप पूर्ण होऊ शकली नाहीत. ती आश्वासने पूर्ण व्हावीत यासाठी संपाचा इशारा देण्यात आला होता. कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्या आणि सामंजस्य करार यासंदर्भात कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप 20 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असे शशांक राव यांनी म्हटले आहे.





























































