
सामना प्रतिनिधी। मुंबई
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आखणीन एक पाऊल उचलले आहे. मराठी भाषा सक्तीच्या करण्याबाबत कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी मंगळवारी 15 तज्ञांची समिती जाहीर केली आहे. या समितीमध्ये ‘पद्मश्री’ मधू मंगेश कर्णिक, कौतिकराव ठाले-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, नागनाथ कोतापल्ले, प्रा. रंगनाथ पठारे, रमेश पानसे आदींचा समावेश आहे. ही समिती दिल्ली बोर्डासह सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबत लवकरच या कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करणार आहे.
या समितीत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार, शिक्षण व मराठी भाषा विभाग यांचे प्रधान सचिव यांच्यासह डॉ. रेणू दांडेकर, दादा गोरे, रमेश कीर, विभावरी दामले व सुधीर देसाई या साहित्यिकांचा आणि शिक्षणतज्ञांचा समावेश आहे.
ही समिती ‘सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य’ याबाबत सकारात्मक चर्चा व विचारविनिमय करून लवकरात लवकर संबंधित कायद्याचा प्राथमिक मसुदा तयार करेल.
हा मसुदा तयार करताना अन्य राज्यांतील स्थानिक, प्रादेशिक भाषांचे शिक्षण याचाही सखोल अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर हा शासनाचा अधिकृत मसुदा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. त्यावर नागरिकांच्या सूचना, अभिप्राय व हरकती मागविण्यात येतील.



























































