
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मागील तीन सत्रांत गुलाबी चेंडूने खेळली गेलेली दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धा यंदा थेट प्रक्षेपणाच्या अभावामुळे लाल चेंडूने खेळली जाणार आहे. हिंदुस्थानातील एकमेव दिवस-रात्र होणाऱया या प्रथमश्रेणी स्पर्धेत देशातील आघाडीचे क्रिकेटपटू सहभागी होत असतात. हिंदुस्थानचा उदयोन्मुख खेळाडू शुभमन गिल, हिंदुस्थान ‘अ’ संघाचा नियमित खेळाडू प्रियांक पांचाळ व रणजी विजेत्या विदर्भ संघाचा कर्णधार फैज फझल यांच्याकडे अनुक्रमे ब्लू, रेड व ग्रीन संघांचे नेतृत्व देण्यात आले आहे.
‘बीसीसीआय’चे महाव्यवस्थापक (क्रिकेट संचालक) सबा करीम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 17 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत बंगळुरूमध्ये तीन संघांमध्ये दुलिप करंडक स्पर्धा रंगणार आहे. 5 ते 9 सप्टेंबरदरम्यान होणारी अंतिम लढत सोडून इतर सर्व लढतींमध्ये लाल चेंडू वापरण्यात येणार आहे. यंदा स्पर्धेचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार नसल्याने लाल चेंडू वापरण्याचा निर्णय घेतला. मात्र अंतिम लढतीचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने या लढतीत गुलाबी चेंडू वापरण्यात येईल. ‘बीसीसीआय’ने दुलिप करंडक स्पर्धेसाठी शुभमन गिल, प्रियांक पांचाळ व फैज फझल या नव्या दमाच्या खेळाडूंकडे तिन्ही संघांचे कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय घेतला.





























































