आता ट्रेनमध्ये एअर होस्टेस देणार सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विमानात मिळते तशी सेवा आता भारती रेल्वे आपल्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये देणार आहे. एका पायलट प्रोजेक्ट अंतर्गत हिंदुस्थानच्या पहिल्या सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ या ट्रेनमध्ये एअर होस्टेस आणि फ्लाइट स्टेवॉर्ड्स तैनात करण्यात आल्या आहेत. या एअर होस्टेस आणि इतर कर्मचारी प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली असून त्याची जबाबदारी इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनला देण्यात आली आहे.

प्रवाशांची संख्या आणखी वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आयआरसीटीसीने 34 प्रशिक्षित एअर होस्टेस वंदे भारत या ट्रेनमध्ये तैनात केले आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतर रेल्वेगाडय़ांमध्येही हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सध्या अनेक रेल्वेगाडय़ांमध्ये परवानाधारक कॅटरर्सच्या कर्मचाऱयांना रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवाशांना जेवण देण्यासाठी 8 ते 9 हजार रुपयांच्या मासिक पगारावर ठेवण्यात आले आहे, मात्र प्रवाशांना आणखी उत्तम खानपान सेवा देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित एअर होस्टेस 25 हजार रुपयांच्या मासिक पगारावर तैनात करण्यात आल्या आहेत.