एसआरए प्रकल्पाची आराखडा मंजुरी व बांधकाम प्रमाणपत्र एकाच वेळेस मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील रखडणारे एसआरएचे प्रकल्प, आर्थिक कारणांमुळे रहिवाशांना घरांचा ताबा मिळवण्यात होणारा विलंब आणि विकासकांना येणाऱया आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आता प्रकल्पाच्या आराखडय़ाचे प्रमाणपत्र आणि बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र (सीसी) दोन्ही एकाच वेळेस देण्याचा महत्त्वाचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतल्या एसआरए प्रकल्पाच्या उभारणीस वेग येणार आहे.

आजच्या घडीला दीड हजारहून अधिक एसआरए प्रकल्पांची नोंदणी एसआरए प्राधिकरणाकडे झाली आहे, पण वेगवेगळ्या कारणांमुळे एसआरए प्रकल्पांचे बांधकाम रखडते. यावर मात करण्यासाठी विकासकांना ही दोन्ही प्रमाणपत्रे एकाच वेळेस देण्याचा महत्त्वाचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने मध्यंतरी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन सादर केले. एसआरए प्रकल्पांच्या उभारणीत येणाऱया अडचणींबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकार दीपक कपूर यांनी परिपत्रक जारी करून इंटिमेशन ऑफ ऍप्रूव्हल(आयओए) आणि बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र(सीसी) एकाच वेळेस जारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इमारतींच्या आराखडा मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र व प्रत्यक्षात बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र एकाच वेळेस मिळणार आहे.

इमारतीचा आराखडा मंजूर करण्याचे प्रमाणपत्र मिळवण्यात अनेकदा विलंब होत होता. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर बांधकाम करण्याचे प्रमाणपत्र मिळत होते, पण आता दोन्ही प्रमाणपत्रे एकाच वेळेस दिली जाणार आहेत. विकास नियंत्रण नियमावली 2034 अंतर्गतच्या तरतुदीनुसार व बांधकाम क्षेत्रातील इतर कायद्यानुसार इमारतींच्या चौथऱयापर्यंतचे आणि गाडय़ा पार्किंगचे बांधकाम होईपर्यंत ही दोन्ही प्रमाणपत्रे एकाच वेळेस दिली जातील.

12 टक्के व्याज माफ
त्याशिवाय बांधकाम सुरू करण्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी भरावे लागणारे शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्याची सुविधा आहे. मात्र त्यावर वार्षिक 12 टक्के व्याज आकारले जात होते. बांधकाम व्यावसायिकांच्या विनंतीनुसार हे 12 टक्के व्याजही माफ करण्याचा निर्णय एसआरए प्राधिकरणाने घेतला आहे.

बांधकाम व्यावसायिकांकडून स्वागत
बांधकाम क्षेत्राने या निर्णयाचे स्वागत केले आहे. या नव्या निर्णयामुळे मुंबई झोपडपट्टीमुक्त होण्यास निश्चित मदत होईल, असे ओमकारचे बाबुलाल वर्मा यांनी सांगितले. प्रॅक्टिसिंग इंजिनीयर्स आर्किटेक्ट ऍण्ड टाऊन प्लॅनर असोसिएशननेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. बांधकाम प्रमाणपत्रावर द्यावे लागणारे व्याज माफ केल्यामुळे विकासकांना फायदा होईल असे असोसिएशनचे मत आहे.