आजपासून अकरावीची विशेष प्रवेश फेरी; 14 ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या तीन सर्वसाधारण प्रवेशफेऱ्या आता संपल्या असून प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. उद्या या फेरीसाठी उपलब्ध जागांचा कॉलेजनिहाय तपशील अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाहीर होणार असून विद्यार्थी प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरू शकणार आहेत.

अकरावीचे वर्ग  सुरू राहतील

विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचे प्रवेश सुरू असतानाच अकरावीचे वर्ग नियमित सुरू असतील. तसेच उशिराने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने जादा वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा, अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.

प्रवेश घेण्यासाठी 19 ऑगस्टपर्यंतची मुदत

विशेष फेरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 10 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. विशेष फेरीची गुणवत्ता यादी 14 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार असून गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 16 ते 19 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

20 ऑगस्टपासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरी

  • विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 20 ऑगस्टपासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीत विद्यार्थ्यांचे तीन गट पाडण्यात आले असून पहिल्या गटात 80 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे, दुसऱ्या गटात 60 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे व तिसऱ्या गटात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
  • 20 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता पहिल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा जाहीर होतील. हे विद्यार्थी 21 ऑगस्टला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यानुसार कॉलेज निवडू शकतात. 22 ऑगस्टला दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागा जाहीर होणार असून 23 ऑगस्टला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हे विद्यार्थी कॉलेज निवडू शकतात. 24 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता तिसऱ्या प्रकारातील विद्यार्थ्यांसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल.

विशेष गुणवत्ता यादीत यांना प्रवेश

  • यापूर्वीच्या प्रवेश फेऱयांमध्ये प्रवेश न घेतलेले
  • यापूर्वीच्या प्रवेश फेऱयांमध्ये प्रवेश नाकारलेले
  • कोणतेही कॉलेज अलॉट न झालेले
  • पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले
  • आधीच्या प्रवेशफेरीतील प्रवेश रद्द केलेले