
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य सेवा या सर्वोत्तम आहेत. मुंबई शहर हे पालिकेच्या सक्षम कामामुळे प्रगतिपथावर आहे, असे कौतुकोद्गार लंडनचे माजी महापौर भगवानजी चोहोन यांनी काढले. महापालिकेच्या काही शाळा आणि आरोग्य केंद्रे लंडनमधील सामाजिक संस्थांना दत्तक घेण्याची इच्छा असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
लंडनचे माजी महापौर भगवानजी चोहोन यांच्या शिष्टमंडळाने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची महापालिकेत सदिच्छा भेट घेतली. यावेळी लंडनचे नगरसेवक जेम्स एली, व्हिल्हेल्मइना मिशेल, मुंबई हाऊसिंग फेडरेशन तज्ञ संचालक विशाल कडणे, व्यावसायिक विजय कडणे, वैभव भुर्वे, विक्रम साठविलकर, चेतन वैद्य, शशी मिस्त्राr, सिद्धेश मिस्त्री, संजय परब, गौरव पोतदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला चोहोन यांनी पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने लंडनमधील नागरिकांनाही स्फुरण चढते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. छत्रपतींचा इतिहास सातासमुद्रापार अधिकाधिक पसरावा यासाठी शिष्टमंडळ प्रयत्नशील असल्याचे मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालक विशाल कडणे यांनी सांगितले.





























































