
>> विद्या कुलकर्णी
बल्गुली. मुळ युरोपियन वंश असलेले हे पक्षी हिमवानाच्या राहणीमानाशी चांगलेच सरावले आहेत.
चळवळे, छोटेसे व रंगीबेरंगी असे बल्गुली पक्षी भव्यदिव्य हिमालयातील पर्वतरांगात व त्याचबरोबर पश्चिम घाटात दिसतात तेव्हा पक्षीप्रेमींसाठी पर्वणीच असते. या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. बल्गुली पक्षी ‘युरोप, आशिया, उत्तर अमेरिका आणि आफ्रिका’ या देशांमध्येही आढळतात. बल्गुली / Tits हे छोटे पक्षी असून त्यांच्या काही प्रजातींचा रंग एखाद्या छटेतच असतो तर काहींच्या अंगांवर विविध रंगांच्या छटा असतात. या पक्ष्यांचे पाय खूप मजबूत व काटक असतात. चोचीचा आकार काहीसा त्रिकोणी असून ती छोटी असते. काही प्रजातींच्या डोक्यावर तुरा असतो. प्रजातीतील बहुतेक फरक त्यांच्या पंखांच्या पिसाऱयाच्या रंगात असतो.
या पक्ष्यांचे ‘कीटकअळ्या, सुरवंट यासारखे कणा नसलेले किडे’ खाद्य असते. हिवाळ्यात ते बियाणे आणि काजूदेखील खातात. त्यांचे खाद्य शोधताना ते झाडाच्या फांदीवर लटकून प्रथम कीटकांचा, बियांचा शोध घेतात. खाद्य एका पायाने पकडून चोचीचा हातोडय़ासारखा उपयोग करून त्याला मारतात किंवा फोडतात. अतिशय टणक असे हेझल नट ते 20 मिनिटांत फोडून खातात. यांच्या काही प्रजाती हिवाळ्यासाठी खाद्य साठवून ठेवताना आढळतात. हे पक्षी त्यांचे घरटे झाडांच्या पोकळीत बांधतात, पण काही प्रजाती मात्र जमिनीवर घरटे बांधतात. एकावेळी मादी प्रजाती नुसार 2 ते 14 अंडी घालते. जास्तीत जास्त 19 अंडी घातल्याचा उल्लेख आढळतो. वर्षातून एकापेक्षा जास्तवेळा पण मादी अंडी घालते. हे पक्षी प्रजनन ऋतूत आपल्या जोडीदाराचे लक्ष्य वेधण्यासाठी उडय़ा मारत नाच करतात. हे आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ असतात. निळा बल्गुली मात्र आपला जोडीदार वारंवार बदलतो.
हिंदुस्थानी पिवळा बल्गुली
या पक्ष्यांचे वास्तव्य हिमालयामध्ये असून हिवाळ्यात पश्चिम घाटात हे पक्षी स्थलांतर करतात. या पक्ष्यांची लांबी 15 सें.मी. असून रंग काळा व पिवळा असतो. डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असतो. नराचे कपाळ, गाल व खालचा भाग पिवळ्या रंगाचा असून पाठ, पंख, बुडी व डोके काळ्या रंगाचे असते. मादी थोडीशी बुटकी असून पाठ फिक्कट शेवाळी रंगाची असते. किशोरवयीन पक्षी फिक्कट रंगाचा असून त्याचा खालचा भाग पांढरा असतो. डोळ्यातील बुबुळं तपकिरी, चोच काळी व पाय राखाडी असतात. हे पक्षी एकेकटे, जोडीने अथवा छोटय़ा समूहाने फिरताना आढळतात.
हिमालयन ब्लॅक लोअर्ड बल्गुली
या पक्ष्यांची लांबी 13 – 14 सें.मी. असते. काळ्या व पिवळ्या रंगाच्या या पक्ष्यांच्या डोक्यावर काळा तुरा असून टोकं पिवळ्या रंगाची असतात. पाठ शेवाळी रंगाची असून मानेपासून खाली येणारा पट्टा काळा असतो. डोळा व चोच यातील भागाला ‘लोअर’ म्हणतात, हा भाग काळा असल्याने त्याला हे नाव मिळाले आहे.
सिनेरस बल्गुली
या पक्ष्यांची पाठ निळसर राखाडी रंगाची असून गालावर व पंखांवर पांढऱया रंगाचा पट्टा असतो. पोटाचा भाग पांढरा असून त्यावर काळ्या रंगाचा पट्टा असतो. मादी फिक्कट रंगाची असून पोटावरच्या काळ्या पट्टय़ाची रुंदी कमी असते.
हिरव्या पाठीचा बल्गुली / Green Backed Tit
या पक्ष्यांची लांबी 13 सें. मी. असून रंग पिवळा-हिरवा-काळा असतो. पंखांमध्ये दोन पांढरे पट्टे असतात. गाल पांढरे असून पाठीवर हिरवा रंग असतो व खालील भाग पिवळा असतो. नर व मादीसारखेच दिसतात.
काळ्या गळ्याचा बल्गुली / Black Throated Tit
या पक्ष्यांची लांबी 10 सें. मी. असून रंग काळा-राखाडी असतो. डोके तांबूस पिंगट रंगाचे असते. शेपटी गडद निळसर- राखाडी रंगाची असून टोके पांढरी असतात. डोळ्यापासून मानेपर्यंत काळा पट्टा असतो.



























































