रशियाही हिंदुस्थानच्या पाठिशी खंबीरपणे उभा; पाकड्यांचे वांदे झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जम्मू कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयाविरोधात कागांवा करणाऱ्या पाकिस्तानला रशियानेही चांगलाच दणका दिला आहे. या मुद्द्यावर रशिया हिंदुस्थानच्या पाठिशी ठामपणा उभा राहिला आहे. हिंदुस्थानचा निर्णय योग्य असून संविधानिक पद्धतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. तसेच या निर्णयानंतर आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पाकिस्तानने संयम पाळत प्रादेशिक शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहनही रशियाने केले आहे.

हिंदुस्थानने जम्मू कश्मीरबाबत घेतलेला निर्णय घटनेच्या चौकटीत राहूनच घेतला आहे. त्यात अयोग्य काहीच नाही. मात्र, पाकिस्तान या मुद्द्यावरून विनाकारण तणाव वाढवत आहे. सद्यस्थितीत दोन्ही देशांनी शांततेने आणि चर्चेने समस्या सोडवाव्यात. पाकिस्तानने तणाव वाढवू नये. दोन्ही देशांनी सांमजस्य दाखवत शांतता पाळावी असे आवाहन रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर चीनकडून सहकार्य मिळेल, अशी पाकिस्तानशी आशा होती. मात्र, चीननेही पाकिस्तानची निराशा केली आहे. दोन्ही देशांनी चर्चेने त्यांच्या समस्या सोडवाव्या, असे चीनने स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयानंतर चीनचा सल्ला घेण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी चीनमध्ये गेले होते. त्यानंतर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सद्य परिस्थितीत शांतता कायम ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी तणाव वाढवू नये,असे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, असे आवाहनही चीनने केले आहे.

जम्मू कश्मीरबाबतची सत्यता पाकिस्तानने स्वीकारावी, तसेच हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे हिंदुस्थानने पाकिस्तानला खडसावले आहे. हिंदुस्थानने जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्याने दहशतवादाला आळा बसणार आहे. आता कश्मीरी नागरिकांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादासाठी प्रोत्साहित करता येणार नसल्याने पाकिस्तानचा कांगावा सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले. चीनने या समस्येत हस्तक्षेपास नकार दिला आहे. तर रशिया ठामपणे हिंदुस्थानच्या पाठिशी उभा राहिल्याने पाकिस्तान एकाकी पडला आहे.