लालूंना कश्मिरी सफरचंद मिळेना, रांचीच्या सर्व बाजारपेठांत शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रांची

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालू प्रसाद यादव शिक्षा भोगत असले तरी सध्या ते येथील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना नाश्त्यामध्ये दररोज दोन सफरचंदे, चार अंडी, बदाम, अक्रोड आणि एक आंबा खाण्याचा सल्ला दिला आहे. पण कश्मीर खोर्‍यातील तणावाच्या वातावरणामुळे लालूंना दररोज दोन कश्मिरी सफरचंद मिळणे मुश्कील झाले आहे.

मुळातच लालूंना सफरचंदे खायला आवडतात. त्यात कश्मिरी सफरचंदांचे तर ते चाहतेच आहेत. मात्र कश्मीरमध्ये 370 कलम हटविल्यानंतर प्रत्यक्ष हिंसाचार नसला तरी तणावाचेच वातावरण आहे. यामुळे तेथून बिहारमध्ये कश्मिरी सफरचंदांची होणारी आवक कमी झाली आहे. लालूंना फायबर आणि व्हिटॅमीन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना दररोज दोन सफरचंदे खायला सांगितली आहेत.

एम्स रुग्णालयात लालूंसोबत सतत असणारे त्यांचे साथीदार सुरिंदर यादव म्हणाले की, राजद प्रमुख बर्‍याच दिवसांपासून सफरचंदांची आठवण काढत ती येण्याची वाट पाहात आहेत. पण रांची येथील बाजारात कश्मिरी सफरचंदे मिळतच नाहीत. आम्ही पूर्ण रांची शहरात कश्मिरी सफरचंदांचा शोध सुरू केला आहे.

पंधरवडाभर वाट पाहावी लागणार

कश्मिरी सफरचंदे खाण्यासाठी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना बहुधा पंधरवड्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण लालपूर भागातील फळ व्यावसायिक मोहम्मद नईमुद्दीन यांनी सांगितले की, कश्मिरी सफरचंद अजून रांची शहरात आलेली नाहीत. किमान 15 दिवसांनी ती येथील बाजारपेठांमध्ये येतील अशी अपेक्षा आहे. कश्मीरमधील तणावाच्या वातावरणामुळे तेथून फळे बिहारमध्ये येत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.