खेड तालुक्यातील पूरग्रस्तांना पालक मंत्री रवींद्र वायकर यांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। खेड

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील भोस्ते, वेरळ व सुकीवली येथील नुकसानग्रस्त कुटुंबाना पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते धनादेश, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून तालुक्यातील अनेक ठिकाणी घरांचे, गोठयांचे अंशतः व पूर्ण नुकसान झाले होते.

जगबुडी व नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकिनारी असलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून संसारोपयोगी वस्तू व अन्नधान्याची नासाडी झाली होती. भोस्ते घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घरांना डोंगरातून आलेल्या चिखल मिश्रित पाण्यामुळे फटका बसला होता. खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने व तहसीलदार शिवाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले होते. शासकीय नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक असलेले परिपूर्ण प्रस्तावानुसार मंजूर झालेल्या नुकसान भरपाईचे धनादेश पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते आज (ता. 14) आपदग्रस्त कुटुंबातील सदस्यांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर व शिवसेना युवानेते योगेश कदम यांच्या वतीने आपदग्रस्त कुटुंबाना संसारोपयोगी वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व कुटुंबाना आवश्यक ती मदत शासनाकडून मिळवून दिली जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी देऊन सारी जनता तुमच्या पाठीशी आहे, सरकार पाठीशी आहे असा दिलासा दिला. तालुक्यातील भोस्ते-वीराची वाडी येथील 19, सुकीवली येथिल 14 व वेरळ येथील 16 आपदग्रस्त कुटुंबाना शासकीय मदतीचे धनादेश, जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, युवानेते योगेश कदम, उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने, तहसिलदार शिवाजी जाधव, तालुकाप्रमुख राजा बेलोसे, निलेश शेठ आदी उपस्थित होते.