टीम इंडियाचा कोच कोण होणार? कपिलदेव यांची समिती आज घेणार निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कोच कोण होणार, याचे उत्तर आज मिळेल. कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखती घेणार आहेत. जगातील प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या या पदासाठी रवी शास्त्रीसह माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत व रॉबिन सिंग हे प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत, मात्र या पदासाठी रवी शास्त्रीच पुन्हा टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

संजय बांगर यांना डच्चू? राठोड यांची एण्ट्री…

फलंदाजांच्या अपयशामुळे वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये हिंदुस्थानचा खेळ खल्लास झाला. त्यामुळे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता या पदासाठी संजय बांगर यांच्यासह 12 जणांचे अर्ज आले आहेत. यामध्ये जॉनाथन ट्रॉट, मार्क रामप्रकाश, थिलान समरवीरा, अमोल मुजुमदार, ऋषिकेश कानिटकर, प्रवीण अमरे या दिग्गजांचा समावेश आहे. मात्र यावेळी संजय बांगर यांना डच्चू देऊन विक्रम राठोड यांना या पदासाठी संधी देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

भारत अरुणच राहणार गोलंदाजी प्रशिक्षक…

भारत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कात टाकलीय. वेगवान गोलंदाजांनी सर्वच स्तरावर आपला ठसा उमटवलाय. त्यामुळे भारत अरुण या पदावर कायम राहतील हे जवळपास निश्चित आहे. व्यंकटेश प्रसाद, डॅरेन गॉफ यांच्यासह आठ जणांनी या पदासाठी अर्ज केला आहे, पण भारत अरुणला डावलण्यात येईल असे वाटत नाही.

दोन वर्षांचा करार होणार

कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे सूर जुळले आहेत. त्यामुळे कर्णधाराचा पाठिंबा रवी शास्त्री यांनाच आहे. कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखाली उद्या क्रिकेट सल्लागार समिती रवी शास्त्राr यांचीच निवड करील हे जवळपास निश्चित झाले आहे. प्रशिक्षकपदासाठी जे नियम करण्यात आले आहेत त्यामध्ये रवी शास्त्राr फिट बसत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत दोन वर्षांचा करार करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जॉण्टी ऱ्होडस् की श्रीधर?

क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी जॉण्टी ऱ्होडस् आणि आर श्रीधर यांच्यामध्ये रस्सीखेच लागणार आहे. आर. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कामगिरीत कमालीची सुधारणा दिसून आलीय. त्यामुळे आर. श्रीधर पुन्हा या पदावर कार्यरत राहतील ही शक्यता नाकारता येत नाही. जॉण्टी ऱ्होडस् याने मुंबई इंडियन्सच्या यशात मोलाचा वाटा उचललाय. त्यामुळे या पदासाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे रंजक ठरणार आहे.