
मुंबईत एकीकडे कांदळवन उद्यानाची घोषणा होत असताना दुसरीकडे बोरिवली-दहिसर परिसरात शेकडो खारफुटी तोडून बेकायदेशीर झोपडय़ा आणि गोदामे उभी राहत आहेत. वनअधिकारी काय करत आहेत, अशा शब्दांत राज्याचे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज वन खात्याचे कान टोचले.
बोरिवलीत देशातील पहिले कांदळवन उद्यान उभारण्यात येत आहे. अशा प्रकारचे कांदळवन उद्यान अंदमान-निकोबारमध्ये उभारण्यात आले आहे. त्यानंतर बोरिवलीत तयार होणारे हे दुसरे कांदळवन उद्यान आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कांदळवन उद्यानाचे भूमिपूजन झाले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, खासदार गोपाळ शेट्टी तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पालिकेने मनात आणले तर मुंबईचा समुद्रकिनाराही मॉरिशसप्रमाणे काचेसारखा स्वच्छ होऊ शकतो. इटलीतील व्हेनिसप्रमाणे मुंबईत ‘वॉटर टॅक्सी’ सेवा सुरू करायला हवी, त्यातच भविष्य आहे. मी मुंबईत जरी कमी येत असलो तरी मनापासून मी स्वतःला एक मुंबईकर समजतो, असेही गडकरी म्हणाले. विदर्भातील पाच जिल्हे लवकरच डिझेलमुक्त होणार आहेत. येत्या काळात बायो सीएनजीचा वापर वाढवणार आहे. महाराष्ट्रातही ई-रिक्षा परमीट फ्री व्हायला हवे, असेही गडकरी म्हणाले.
कोरा केंद्राला 100 कोटी
महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण बोरिवलीच्या कोरा केंद्रातील विस्तृत जागेवर मोठय़ा प्रकल्पाची सुरुवात करू. या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन गडकरींनी या वेळी दिले.






















































