सतत धावणाऱ्या मुंबईकडून प्रेरणा! भुयारी मेट्रोला दिले ‘अॅक्वा लाइन’ नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही भुयारी मेट्रो रेल्वे कशी असेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेट्रोच्या गाडीच्या प्रतिकृतीचे अनावरण आज करण्यात आले. पूर्णतः वातानुकूलित असलेल्या या मेट्रोमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच त्यांचा प्रवास बोअरिंग होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. कधीही न झोपणारी मुंबई पाण्याच्या प्रवाहाप्रमाणेच सतत पुढे कार्यरत राहते. त्यातूनच प्रेरणा घेऊन या मेट्रो-3 लाइनला ‘ऍक्वा लाइन’ असे नाव देण्यात आले आहे.

मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसीएल) मेट्रो-3 या भुयारी मेट्रोच्या गाडय़ांचे डिझाईन आणि निर्मितीचे काम आलस्टोम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड कंपनीला दिले होते. एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मेट्रो-3 च्या डब्याच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. भुयारी मेट्रो ही मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मेट्रोच्या डब्यांचा रंगही ऍक्वा ग्रीन ठेवला गेला आहे. मेट्रो-3 मार्गावर आठ डब्यांच्या 31 गाडय़ा धावणार आहेत. आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे या गाडय़ांची निर्मिती करण्यात आली आहे.

वैशिष्टय़े…
पूर्णतः वातानुकूलित
माहिती, जाहिराती, मनोरंजनासाठी डब्यांमध्ये एलसीडी स्क्रीन्स
डिजिटल मार्गदर्शक
प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा
कमरेला त्रास होणार नाही अशी आसनव्यवस्था
अपंगांच्या व्हीलचेअरसाठी खास जागा
पाय घसरणार नाही असे फ्लोरिंग
प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही
प्रत्येक डब्यात अद्ययावत अग्निशमन यंत्रणा
आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी-नियंत्रक संपर्काची विशेष व्यवस्था