पोलिसांची तत्परता, पसार झालेल्या सराईत दुचाकी चोराला अवघ्या 8 तासांत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला सराईत मोटारसायकल चोरटा सेनगाव येथील न्यायालयात हजर करुन परत आणत असतांना पोलिसांच्या गाडीतुन उडी मारुन पसार झाला होता. या चोरट्याला आखाडा बाळापुर व स्थानिग गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या आठ तासात कोंबींग ऑपरेशन करुन जेरबंद केले आहे.

हिंगोली येथील स्थानिग गुन्हे शाखेच्या पथकाने 17 ऑगस्ट रोजी 26 मोटारसायकल चोरी करणारा चोरटा देवीदास बापुराव कांबळे रा. बेगलुर जि. नांदेड यास पकडुन आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरट्यास सेनगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 20 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयातुन परत आखाडा बाळापुर येथे आणत असतांना मोरवाडी शिवारात गतिरोधकाजवळ व अंधाराचा फायदा घेऊन आरोपी उडी मारुन पसार झाला.

या प्रकाराची माहिती जमादार वडकिले यांनी दुरध्वनीवरुन आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक जगदिश भंडारवार व आखाडा बाळापुरचे पोलीस निरीक्षक गणपत राहिने यांनी पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, पोलीस कर्मचारी संजय मार्के, नागोराव बाभळे, बाबाराव पोटे, गजानन सरकटे, गजानन भालेराव, वडकिले, भोग व होमगार्ड यांच्या पथकासह कोंम्बींग ऑपरेशन राबवुन मोरवाडी शिवारातील भयानक जंगलातुन अवघ्या आठ तासात आरोपी देवीदास कांबळे याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.