
मध्य रेल्वसाठी अद्याप वातानुकूलित लोकल दाखल झाली नसली तरी पश्चिम रेल्वेवर तिसरी एसी लोकल दाखल होण्याच्या तयारीत आहे. मध्य रेल्वेची वातानुकूलित लोकल आल्यावर तांत्रिकदृष्टय़ा सोयीचे असल्याने सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर मार्गावर तिला चालवण्याची मध्य रेल्वेची योजना आहे.
एसी लोकलची निर्मिती चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात होत असून अशा 10 एसी लोकल तयार केल्या जाणार असून अर्ध्या मध्य रेल्वेला मिळणार आहेत. या लोकलची अंतर्गत विद्युत यंत्रणा (मोटर आणि इलेक्ट्रीक) भारत हेव्ही इलेक्ट्रीकल्स लिमिटेड अर्थात ‘भेल’ कंपनीने तयार केली आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार मार्गावर 25 डिसेंबर 2017पासून वातानुकूलित लोकल धावत आहे. आम्ही एसी लोकलला तिन्ही मार्गांवर चालवू शकतो. परंतु सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर एसी लोकलला प्रथम चालवणे सोयीचे आहे. कारण हार्बर मार्गावर वांद्रय़ाच्या पुढे लोकलच्या फेऱया दर दहा मिनिटांमागे एक असल्याने एसी लोकलला चांगला पाथ मिळू शकतो, असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱयाने सांगितले. गोरेगाव ते अंधेरी या एसी लोकलला प्रवाशी मिळू शकतात. वांद्रे येथेही चढउतार करणारे भरपूर असून बहुतेक जण बीकेसी परिसरात कार्यालयात जाणारे असल्याने हा मार्ग एसी लोकलला योग्य असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
ब्रिटिशकालीन पुलांचा अडसर
पहिल्या एसी लोकलप्रमाणेच दुसऱया चाचणी सुरू असलेल्या एसी लोकललाही जादा उंचीचा अडसर आला आहे. मध्य रेल्वेवर ब्रिटिशकालीन पुलांची उंची कमी असल्याने ही अडसर आला आहे. पश्चिम रेल्वेला मिळालेल्या पहिल्या एसी लोकलची उंची 4.335 मीटर इतकी होती. प्रत्यक्षात तांत्रिकदृष्टय़ा लोकलची किमान उंची 4.270 मीटर असणे आवश्यक आहे. रेल्वेला बोर्डाला भविष्यातील एसी लोकलची उंची 4.270 मीटर असणे आवश्यक असल्याचे कळवण्यात आले आहे.
…तर धिम्या मार्गावर धावेल एसी लोकल
मध्य रेल्वेच्या पनवेल ते गोरेगाव मार्गावरही एसी लोकल चालवली जाऊ शकते. कारण वाशी मार्केटचे व्यापारी तिचा वापर करू शकणार आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण मार्गावर चालवायची झाल्यास प्रथम धिम्या मार्गावर चालवण्याची योजना आहे. कारण जलद मार्गावर एसी लोकल चालवल्यास साध्या लोकलच्या फेऱया रद्द कराव्या लागतील आणि त्यामुळे अंबरनाथ, टिटवाळा आणि बदलापूरवरून येणाऱया प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

























































