काँग्रेसला धक्का,निर्मला गावीत यांचा राजीनामा;आज शिवबंधन बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावीत यांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. उद्या बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. निर्मला गावीत यांच्या राजीनाम्यामुळे इगतपुरीत काँग्रेसला हादरा बसला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांच्या कन्या निर्मला गावीत आमदारकीचा राजीनामा देणार याबाबत जोरदार चर्चा होती. विधिमंडळात आज दुपारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी  निर्मला गावीत म्हणाल्या, काँग्रेस पक्षाबाबत कोणतीही नाराजी नाही. मतदारसंघाच्या विकासासाठी व स्थानिक प्रश्नावर शिवसेनेच्या माध्यमातून मार्ग निघण्याची आशा आहे. मतदारसंघातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत असून शिवसेनेसोबत निष्ठsने राहून काम करणार आहे. उद्या ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.