
मुंबईतील विविध चाळी, म्हाडाच्या इमारतींत राहणाऱया भाडेकरूंच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच तक्रारी जाणून घेण्यासाठी 22 ऑगस्टला सायंकाळी 5.30 वाजता डोंगरी येथील सेंट जोसेफ सभागृहात म्हाडा आणि मुंबई महापालिकेच्या वतीने भाडेकरूंचा संयुक्त तक्रार निवारण मेळावा होणार आहे. या मेळाव्यात म्हाडा आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि तज्ञ मंडळी भाडेकरूंच्या शंकांना उत्तरे देणार आहेत. तसेच विविध प्रश्नांवर कायदेशीर मार्गदर्शनदेखील करणार आहेत.
घरमालक आपल्याला विनाकारण त्रास देत आहे का? विकासकाने आपल्याला फसवले आहे का? आपण राहत असलेली म्हाडाची इमारत मोडकळीस आली आहे आहे का? विकासक-घरमालक एकत्र येऊन आपल्याला घराबाहेर काढत आहे का? विकासकाने आपली चाळ पाडली, पण चाळीच्या विकासाचे काम बंद करून तो भाडेही देत नाही का? इमारतीमध्ये तुम्ही घर घेतले पण मुंबई महानगरपालिकेने ते अनधिकृत ठरवले आहे का? महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाचे मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती, म्हाडाच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी -पुनर्बांधणीसाठी-पुनर्विकासासाठी निश्चित धोरण कोणते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मेळाव्यात मिळतील.
तक्रार निवारण मेळाव्यात म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे मुख्य अधिकारी कैलाश लोखंडे, सहमुख्य अधिकारी अनिल गोटे, मुख्य अभियंता सुनील जाधव, उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी, शिवकुमार आडे, सहाय्यक पालिका आयुक्त विनायक विसपुते मार्गदर्शन करतील. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, खासदार व शिवसेना सचिव अनिल देसाई, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेत्या मीना कांबळी, उपनेते राजकुमार बाफना आदी उपस्थित राहणार आहेत. विभागातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात व त्यावर उपाय जाणून घ्यावेत, असे आवाहन शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर यांनी केले आहे.





























































