खेड भरणे मार्ग धोकादायक ,महाड नाक्यावरील खड्डे जीवघेणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड नगरपरिषेदच्या ताब्यात असलेल्या खेड भरणे मार्गावर खोदण्यात आलेली साईटपट्टी अद्याप योग्य प्रकारे भरली गेली नसल्याने हा मार्ग अतिशय धोकादायक झाला आहे. त्यातच महाडनाका येथील राजपूरकर कॉम्प्लेक्स समोर पडलेले मोठमोठे खड्डे चुकविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने खोदलेली साईटपट्टी आणि जीवघेणे खड्डे वेळीच बुजवले नाही तर या ठिकाणी भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेला खेड भरणे हा मार्ग आधीच अरुंद आहे. दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर ती पास करताना चालकांना आपले कौशल्य वापरावे लागते. त्यातच आता साईटपट्टी खोदण्यात आली असल्याने रास्ता आणखीनच अरुंद झाला आहे. त्यामुळे समोरून एखादे अवजड वाहन आले तर दुचाकी किंवा तीनचाकी वाहनचालकांना खड्डे पडलेल्या साईटपट्टीवर उतरावे लागते. सध्या पाऊस असल्याने साईटपट्टीवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी किंवा तीनचाकी खड्ड्यात आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मे महिन्यात याच खोदलेल्या साईटपट्टीवरील खड्ड्यात दुचाकी आदळून एका महाविद्यालयीन युवकाचा बळी गेला होता. या अपघातानंतर खोदलेली साईटपट्टी तात्काळ बुजवणे आवश्यक होते. मात्र ज्या महावितरणच्या ठेकेदाराने साईटपट्टी खोदली त्याने पळ काढल्याने साईटपट्टी बुजवण्याचे काम अद्याप झालेले नाही. सद्य स्थितीत खोदलेली साईटपट्टी अपघातांना आमंत्रण देणारी ठरत असल्याने नगरपालिका प्रशासनाने ती वेळीच बुजवणे गरजेचे आहे.

साईटपट्टीचा धोका डोक्यावर असताना महाडनाका येथील राजपूरकर कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे वाहन चालकांच्या विशेष करून दुचाकी व तीनचाकी वाहन चालकांच्या पोटात भीतीचा गोळा आणणारे आहेत. या मार्गावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी याच मार्गावरून सतत जा ये करत असतात. खड्डे वेळीच बुजवले गेले नाही तर या खड्ड्यामुळेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आणखी कुणाचा बळी जाऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने वेळीच योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी वाहन चालक व प्रवासी करत आहेत.