
बारावी फेरपरीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळ यंदाही पिछाडीवर आहे. इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत सलग तिसऱ्या वर्षी मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 19.12 टक्के लागला आहे. राज्यातील 1 लाख 31 हजार 355 विद्यार्थी बारावीच्या फेरपरीक्षेला बसले होते. यांपैकी केवळ 30 हजार 438 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यांपैकी 111 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी (डिस्टिंक्शन) मिळाली आहे.
राज्याचा बारावी फेरपरीक्षेचा एकूण निकाल 23.17 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा या निकालात फक्त 0.52 टक्क्यांची वाढ झाली आहे. सर्वाधिक निकाल लातूर विभागीय मंडळाचा 33.89 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 94 हजार 413 मुले तर 36 हजार 942 मुली बसल्या होत्या. यांपैकी 19 हजार 952 मुले आणि 10 हजार 486 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 28.39 तर मुलांचे 21.13 इतके आहे. मुंबई विभागातून परीक्षेला दिलेल्या 37 हजार 71 विद्यार्थ्यांपैकी केवळ 7 हजार 88 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत.
सायन्स शाखेचा निकाल सर्वाधिक
आर्टस् आणि सायन्स शाखेच्या तुलनेत सायन्स शाखेचा निकाल सर्वाधिक 28.51 टक्के इतका लागला आहे. आर्टस्चा निकाल 21.40, कॉमर्सचा 21.76 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल 20.01 टक्के इतका लागला आहे. सायन्स शाखेचा लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक 55.25 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 15.70 टक्के आहे. आर्टस् शाखेतही लातून विभागाने बाजी मारली असून 25.58 टक्के इतका निकाल लागला आहे. तर पुणे विभागाचा आर्टस्चा निकाल सर्वात कमी 16.76 टक्के लागला आहे. कॉमर्समध्येही लातूरचा निकाल सर्वाधिक 31.48 टक्के तर सर्वात कमी निकाल पुणे विभागाचा 19.91 टक्के लागला आहे.



























































