
>> व्यंकटेश बोर्गीकर
सेवानिवृत्तांच्या वेतनाविषयीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. अलीकडेही त्यावर बरीच चर्चा सुरू आहे. मात्र अनेकदा हजारो सेवानिवृत्त कर्मचारी किंवा त्यांची कुटुंबे यांना निवृत्तीवेतनाचे नियम, त्यात होणारे बदल, सुधारणा याविषयी नेमकी कल्पना नसते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा हजारो निवृत्तांची ही अडचण नेमकी ओळखली की डोंबिवली येथील सुधाकर बाळकृष्ण मेहरूणकर यांनी. अनेक ज्ञात-अज्ञात सेवानिवृत्तधारकांना त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि मदतीचा लाभ झाला आहे. मेहरूणकरांनी निवृत्तीवेतन विषयावर फक्त पुस्तकेच लिहिलेली नाहीत तर अनेकांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. मेहरूणकर हे पश्चिम रेल्वेमध्ये वरिष्ठ मंडळ लेखा परीक्षा अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. नोकरीत असताना ते कर्मचारी प्रश्नांविषयी सक्रिय होते. समाजकार्याचीही त्यांना आवड असल्याने अनेक कर्मचाऱयांचे वेगवेगळे प्रश्न ते उत्स्फूर्तपणे सोडवत. कार्यालय सुटल्यानंतरही ते सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत. निवृत्तीनंतर तर त्यांनी समाजकार्य हेच धोरण ठरविले. ज्येष्ठ नागरिक संघाचे काम त्यांनी केले. त्याचवेळी रेल्वेशी संबंधित अनेक समस्यांचा पाठपुरावा करून त्या मार्गीही लावल्या. डोंबिवलीच्या पूर्वेला रामनगर भागात एक स्वतंत्र रेल्वे तिकीटघर असावे अशी मागणी होती. ती मेहरूणकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे धसास लावून मंजूर करून घेतली. मात्र मेहरूणकर हे खऱया अर्थाने लोकप्रिय ठरले ते सेवानिवृत्त कर्मचाऱयांमध्ये. नोकरीत असताना वेगवेगळय़ा विभागांत केलेले काम आणि कर्मचाऱयांच्या विविध प्रश्नांचा निपटारा करण्याची सवय यातून त्यांना जे ज्ञान आणि अनुभव मिळाला त्याचा उपयोग त्यांना सेवानिवृत्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी झाला. त्यामुळे व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर कुठलीही निवृत्तीवेतनाबाबतची अडचण आली की, अनेकांना सुधाकर मेहरूणकर यांचा आधार वाटतो. 1995 मध्ये पाचव्या वेतन आयोगाचे काम सुरू झाले आणि त्याची पूर्तता 1999 मध्ये झाली. या दरम्यान निवृत्त कर्मचाऱयांना पेन्शनमध्ये किती वाढ होणार, त्यासाठी काय करावे लागेल असे अनेक प्रश्न सतावत होते. त्याचे निराकरण व्हावे यासाठी मेहरूणकर डोंबिवली येथील पांडुरंग विद्यालयात दर बुधवारी बैठक घेऊन मार्गदर्शन करीत असत. एका राष्ट्रीय बँकेत अनेक पेन्शनरांची मोठी रक्कम तशीच पडून होती. त्याची कारणे अनेक होती. अनेकांचे निधन झाले होते. त्याबाबत बँक अनभिज्ञ होती. काही आजारी किंवा एकाकी असल्यामुळे बँकेत येऊ शकत नव्हते. काहींना कौटुंबिक कलहांमुळे अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे त्या बँकेत पेन्शन खात्यात तब्बल दीड कोटी रुपये पडून होते. साहजिकच बँकेच्या वरिष्ठांकडून या रकमेची योग्य विल्हेवाट लावण्यासंबंधी आदेश आला. त्यातही फक्त तीन दिवसांचीच मुदत देण्यात आली होती. या परिस्थितीतही बँक आणि संबंधित पेन्शनर्स यांच्या मदतीला मेहरूणकरच आले. ठाकुर्ली ते मुंब्रा या पट्टय़ातील अशा अनेक पेन्शनरांशी त्यांनी प्रचंड मेहनत करून संपर्क साधला. त्यांच्याकडून निर्धारित स्वरूपातील अर्ज आणि कागदपत्रे घेतली, ती बँकेत सादर केली. त्यातून सुमारे 77 लाख रुपये थकीत पेन्शनचे वाटप होऊ शकले. हे केवळ मेहरूणकर यांच्यामुळेच शक्य होऊ शकले. अर्थात हा सर्व खटाटोप करताना त्यांना प्रचंड त्रास झाला, मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी तो सहन केला. निवृत्तीवेतनधारक आणि त्यांचे कुटुंबीय यांना निवृत्तीवेतनाचे इंग्रजीतील नियम, अटी अनेकदा समजत नाहीत. त्यावर उपाय म्हणून मेहरूणकर यांनी आपल्या सहकाऱयांच्या मदतीने 2010 पासून ‘रेल संदेश’ हे त्रैमासिक मराठीतून सुरू केले. त्यामुळे निवृत्तीवेतनासंबंधीचे इंग्रजीमधील कायदे, नियम आणि इतर सरकारी निर्णय यांची माहिती संबंधितांना मराठीतून उपलब्ध होऊ लागली. त्याचा लाभ हजारोंना झाला. मेहरूणकर यांचे पेन्शनविषयक ज्ञान प्रचंड आहे. रेल्वे प्रशासनदेखील त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करून घेत असते. रेल्वेच्या ‘पेन्शन अदालत’ या कार्यक्रमासाठी त्यांना आवर्जून आमंत्रण असते. गेल्या 20-25 वर्षांत मेहरूणकर यांनी हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना निवृत्तीवेतनविषयक अडीअडचणीत सर्व प्रकारची मदत केली. त्यामुळे त्यांना निवृत्तीवेतनच नव्हे तर थकबाकीदेखील मिळाली. या वयातही त्यांच्या घरी दररोज वेगवेगळय़ा ठिकाणांहून येणाऱया निवृत्तीवेतनधारकांची वर्दळ असते आणि मेहरूणकरही आनंदाने त्यांच्या अडचणी सोडवण्यास व्यग्र असतात. निवृत्तीवेतनावर त्यांचे प्रभुत्व असल्याने त्यांना कुठले पुस्तक किंवा अन्य कायदय़ांचा अभ्यास करण्याची गरज भासत नाही. निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या हक्काचे पैसे सरकारकडून मिळावेत यासाठी त्यांचा हा ‘यज्ञ’ अखंड सुरू आहे. पेन्शनरांसाठी मेहरूणकर हे आधारच ठरले आहेत.
- सुधाकर मेहरूणकर यांचे पेन्शनविषयक ज्ञान प्रचंड आहे. रेल्वे प्रशासनदेखील त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करून घेत असते. गेल्या 20-25 वर्षांत मेहरूणकर यांनी हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना निवृत्तीवेतनविषयक अडीअडचणीत सर्व प्रकारची मदत केली. त्यामुळे त्यांना निवृत्तीवेतनच नव्हे तर थकबाकीदेखील मिळाली. पेन्शनरांसाठी मेहरूणकर हे आधारच ठरले आहेत.
(लेखक कथाकथनकार आहेत. )




























































