असीम अमुची ध्येयासक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जयेंद्र लोंढे

विराट कोहलीच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला जे जमले नाही, ते विक्रांत केणीच्या अपंग हिंदुस्थानी क्रिकेट संघाने करून दाखवले. विराट कोहलीच्या टीम इंडियाला इंग्लंडमधील वन डे वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. मात्र विक्रांत केणीच्या हिंदुस्थानी संघाने इंग्लंडला त्यांच्याच देशात धूळ चारत जागतिक ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. स्पॉन्सर्सचा मदतीचा हात नाही, मीडियामध्ये प्रसिद्धी नाही आणि कोणाच्या खिजगणतीत नाही, तरीही अपंगत्वावर मात करीत सातासमुद्रापार देशाचा झेंडा रुबाबात फडकवणाऱया या क्रिकेटपटूंनी देशासाठी केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद ठरलीय.

देशातील इतर खेळांतील संघटनांप्रमाणेच अपंग क्रिकेटच्याही एकापेक्षा जास्त संघटना होत्या. मात्र बीसीसीआयकडून एक संस्था करण्याची अट घालण्यात आल्यानंतर एका संघटनेखाली खेळण्याची तयारी सर्वांनीच दाखवली. त्यानंतर इंग्लंडमधील जागतिक स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. हिंदुस्थानी संघासाठी सुरुवातीला 500 जणांची निवड करण्यात आली. त्यानंतर 120 आणि अखेर 31 जणांचा अंतिम संघासाठीच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला. करसन घावरी, उमेश कुलकर्णी, दीपक यादव, प्रसाद देसाई, ब्रिजेश सोलकर व रोहित झलानी यांच्या खांद्यावर खेळाडूंच्या निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अखेर 20 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामधील चार खेळाडू पर्यायी होते.

मुंबईचे माजी प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांच्या खांद्यावर प्रशिक्षकाची धुरा सोपवण्यात आली. मुख्य प्रवाहातील संघ व अपंग संघ यांच्यामध्ये कमालीचा फरक आहे. दोन्ही संघांना प्रशिक्षण करण्याच्या तऱहा वेगळ्याच. त्यामुळे त्यांच्यासमोरही मोठे आव्हान होते. मात्र या कारणामुळे ते डगमगले नाहीत. या संघातील खेळाडूंची गुणवत्ता व जिद्द अफाट होती हे त्यांना बदलापूर येथील सरावात प्रकर्षाने दिसून आले. अपंग आहे म्हणून दयामाया दाखवली जाणे हे त्या खेळाडूंना पटत नाही. उलट मैदानात डबल मेहनत करण्याची त्यांची तयारी असते. क्रिकेटमधील मोलाच्या मार्गदर्शनासाठी ते भुकेलेले होते.
सुरुवातीला कर्णधाराची निवड करण्यात आली. सुलक्षण कुलकर्णी यांना या संघात महेंद्रसिंग धोनीची ‘कॉपी’ दिसली. त्याचे नाव विक्रांत केणी. शांत स्वभावाचा, क्रिकेटची जाण असलेला, संघाला सोबत घेऊन जाणारा आणि महत्त्वाचे म्हणजे संघातील इतर खेळाडूंना त्याच्याबद्दल आदर असलेला ही विशेषणे विक्रांत केणीसाठीच. या अष्टपैलू खेळाडूच्या खांद्यावर नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. येथून सुरू झाला ऐतिहासिक प्रवास.
इंग्लंडचे खेळाडू फक्त 18 टक्के अपंग तरीही…

हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. ही लढत हिंदुस्थानने 36 धावांनी जिंकली. या स्पर्धेची महत्त्वाची बाब म्हणजे शरीरात असलेल्या अपंगत्वाची सरासरी पाहता हिंदुस्थानचा संघ 40 टक्के तर इंग्लंडचा संघ फक्त 18 टक्के अपंग होता. एकूण काय तर इंग्लंडचे खेळाडू बऱयापैकी चांगल्या अवस्थेत होते. तरीही हिंदुस्थानने या स्पर्धेत एकही लढत न गमावता जेतेपदाला गवसणी घातली हे विशेष!

कुणाल, गणेश जबरदस्त
सुलक्षण कुलकर्णी यांनी या संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासोबत त्यांच्या वैयक्तिक समस्यांची काळजी घेतली. कुणाल फणसे हा महाराष्ट्रातील खेळाडू. पुढचा पाय व मागची बाजू यामुळे त्याला फलंदाजी करताना अडचण होत असे. प्रशिक्षकांनी त्याची ही समस्या सोडवली. या मराठमोळ्या खेळाडूने जेतेपदाच्या लढतीत 36 धावांसह दोन फलंदाजही बाद केले आणि सामनावीराचा मान संपादन केला. सुगणेश या आंध्रच्या खेळाडूचेही क्रिकेटमध्ये मन लागत नव्हते. त्याची आई ‘आयसीयू’मध्ये होती आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. सुलक्षण कुलकर्णी यांनी त्याला समजवले. ‘‘पैशांचे टेन्शन घेऊ नकोस. ऑनलाइन ट्रान्सफर करूया. तू फक्त क्रिकेटवर लक्ष दे.’’ त्यानंतर या पठ्ठय़ाने अंतिम लढतीत 11 चेंडूंत 33 धावा करीत हिंदुस्थानला 180 धावांचा टप्पा गाठून दिला.

अनिल जोगळेकरांमुळेच शक्य झाले
जागतिक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघ निवडला गेला, पण इंग्लंडमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक बाबींची गरज होती. यावेळी कोणीही संघाच्या मदतीला धावून आला नाही. सीएस इन्फोकॉमचे अनिल जोगळेकर यांच्यामुळे संघाला आर्थिक पाठबळ मिळाले. याप्रसंगी ते म्हणाले, अजित वाडेकर यांच्यामुळे या संघटनेची स्थापना झाली आहे. ते आता आपल्यासोबत नाहीत. आमचे घरचे संबंध होते. या संघाला सीएस इन्फोकॉमद्वारे आर्थिक सहाय्य केले. ट्वेण्टी-20सारखा मानाचा चषक जिंकल्यानंतरही विजेत्यांचे म्हणावे तसे कौतुक झाले नाही. पुरस्कारांसाठी पुढाकार घेतला गेला नाही. त्यामुळे सुलक्षण कुलकर्णी व अनिल जोगळेकर या दोन्ही व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली. आगामी काळात या संघालाही पाठबळ मिळायला हवे अशी इच्छाही व्यक्त करण्यात आली.

टार्गेट साधले
सुलक्षण कुलकर्णी यांना संघातील खेळाडूंवर प्रचंड विश्वास होता. या संघातील खेळाडूंचे क्षेत्ररक्षण अफलातून आहे हे त्यांनी सरावादरम्यान हेरले होते. म्हणूनच वर्ल्ड कपदरम्यान त्यांनी खेळाडूंसमोर टार्गेट ठेवले. त्यानुसार पाच लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांचे दहा फलंदाज ‘रन आऊट’ करायचे. हिंदुस्थानी खेळाडूंनी या स्पर्धेतील पाच लढतींमध्ये नऊ फलंदाजांना ‘धावचीत’ करीत प्रशिक्षकांनी दिलेले टार्गेट साध्य करून दाखवले.

नुकताच अपंग हिंदुस्थानी क्रिकेट संघाने इंग्लंडला त्यांच्याच देशात धूळ चारत जागतिक ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. स्पॉन्सर्सचा मदतीचा हात नाही, मीडियामध्ये प्रसिद्धी नाही आणि कोणाच्या खिजगणतीत नाही, तरीही अपंगत्वावर मात करीत सातासमुद्रापार आपल्या देशाचा झेंडा रुबाबात फडकवणाऱया या क्रिकेटपटूंनी देशासाठी केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे.

– [email protected]