
समुद्र कवेत घेणाऱ्या हजारो खलाशांचे नेतृत्व करणारी संघटना शिवसेनेत दाखल झाल्याने आता जगातील समुद्रांमध्येही भगवा फडकणार असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ ही संघटना ‘सीटू’ला रामराम करून आज शिवसेनेत सामील झाली. राष्ट्रीय नाविक कामगार परिषदेत तसा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी संघटनेच्या हजारो खलाशांचे शिवसेनेत स्वागत केले.
चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालयात ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’चे देशभरातील हजारो कामगार आणि कर्मचारी या परिषदेला उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचतारांकित हॉटेल्स, रेल्वे, विमान कंपन्या, विमानतळ, वाहतूक क्षेत्रे यामध्ये शिवसेनेच्या कामगार संघटना आहेत. आजपासून तुमच्यामुळे समुद्रातही शिवसेनेची संघटना सक्रिय झाली असून ही ताकद समुद्रातून दिल्लीकडे नेणारी आहे असे प्रशंसोद्गार आदित्य ठाकरे यांनी यावेळी काढले.
जय जवान… जय किसान… जय कामगार!
जिथे अन्याय असेल तिथे जात-पात-धर्म आणि झेंडय़ाचा विचार न करता न्याय देण्यासाठी शिवसेना लढते आणि शेतकरी, कामगार, जवान यांच्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर असते असे सांगतानाच ‘जय जवान…जय किसान…जय कामगार’ असा नाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. लोकांची सेवा करणाऱया आणि संघर्षाची तयारी असणाऱया व्यक्तींना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत असे त्यांनी सांगितले. लाल झेंडा सोडून भगवा हाती घेणाऱया नाविक कामगारांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक असून हा तुमच्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे असे याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत म्हणाले. नाविक कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना उपनेते राजकुमार बाफना, आमदार सुनील शिंदे, अक्षय बिरवाडकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कम्युनिस्ट कमी पडल्याने शिवसेनेत आलो – बिरवाडकर
फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’चे देशातील 11 राज्यांमध्ये 52,500 तर महाराष्ट्रात 18 हजार सदस्य आहेत. या संघटनेचे कामगारांसाठी भिवंडी येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे तसेच माणगाव येथे वृद्धाश्रम आहे. नरेश बिरवाडकर हे या संघटनेचे गेली अनेक दशके प्रभावीपणे नेतृत्व करत आहेत. कामगारांना न्याय मिळवून देताना त्यांच्यावर प्राणघातक हल्लेही झाले, परंतु न डगमगता त्यांनी संघटना वाढवली. गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, परंतु कम्युनिस्ट विचारांच्या ‘सीटू’मध्ये राहून कामगारांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळेच आम्ही शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि तसा ठराव सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते बिनविरोध मंजूर झाला असे याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस नरेश बिरवाडकर यांनी सांगितले. संघटनेच्या 52 हजारांपेक्षा जास्त सदस्यांना बरोबर घेऊन शिवसेनेचा भगवा झेंडा जगात नेईन असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



























































